सोलापूर : ‘ये सैतान है, मुझे तकलीफ दे रहा है...’ असे मोठमोठ्याने ओरडत एका मनोरुग्णाने बेघर रुग्णाच्या डोक्यात सलाईन लावण्याचे लोखंडी स्टँड घालून खून केला. हा प्रकार सोमवारी (दि. १३) रात्री आठ वाजता घडला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
युसूफ मौलाली पिरजादे (वय ३४, रा. तिरंगानगर, विडी घरकुल, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या रुग्णाचे नाव आहे. युसूफ पीरजादे याला छातीचा आजार आहे. त्यामुळे त्याला उपचारासाठी आठ दिवसांपूर्वी शासकीय रुग्णालयात बी ब्लॉकमध्ये तिसऱ्या मजल्यावर पुरुष वॉर्डात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री तो रुग्णालयातून पळून गेला होता. नातेवाइकांनी पुन्हा त्याला उपचारासाठी शनिवारी रात्री ॲडमिट केले. युसूफ पीरजादे याच्या शेजारी जमिनीवर एक बेघर रुग्ण होता. सोमवारी बेघर रुग्ण आपल्या जमिनीवर टाकलेल्या बेडवर झोपला होता. तेव्हा युसूफ पीरजादे हा अचानक उठला व बेघर रुग्णाकडे हात करून ‘ये शैतान है, मुझे तकलीफ दे रहा है...’ असे ओरडू लागला. काही कळायच्या आत त्याने त्याला लावलेल्या सलाईनचा लोखंडी स्टँड उचलला अन् बेघर रुग्णाच्या डोक्यात घातला.
एकापाठोपाठ तीन वेळा प्रहार केले व मोठमोठ्याने ओरडू लागला. हा प्रकार पाहून वॉर्डमधील अन्य लोक धावून आले. त्यांनी त्याच्या हातातील लोखंडी स्टँड काढून घेतले. डॉक्टर व नर्स धावून आले. हा प्रकार पाहून पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता बेघर वृद्ध रुग्ण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. पोलिसांनी तत्काळ युसूफ पीरजादे याला ताब्यात घेऊन दुसऱ्या रूममध्ये ठेवले. डॉक्टरांनी बेघर रुग्णाची पाहणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी डॉ. सौरभ संजय राऊत (वय २७, रा. बी १ क्वार्टर, बी ब्लॉकमागे) यांनी फिर्याद दिली आहे. तपास फौजदार शांताराम वाघमारे हे करीत आहेत.
युसूफ पीरजादे हा मनोरुग्ण असल्याची चर्चा
युसूफ पीरजादे हा रात्री आरडाओरड करीत होता. डॉक्टर नर्सला आवाज देत होता. विचित्र आवाज काढत होता, त्यामुळे तो मनोरुग्ण असावा असा सर्वांचा समज झाला होता. युसूफ पीरजादे हा शुक्रवारी वॉर्डमधून पळून गेल्यानंतर त्याला पुन्हा ॲडमिट केले जात नव्हते. मात्र नातेवाइकांनी विनंती केल्यामुळे पुन्हा ॲडमिट झाला होता.
कोविडमुळे मनोरुग्ण वॉर्ड बंद
शासकीय रुग्णालयात मनोरुग्णासाठी वेगळा वॉर्ड आहे. मात्र कोरोनाच्या काळात वॉर्ड बंद करण्यात आला आहे. वास्तविक पाहता मनोरुग्णाचा वॉर्ड सुरू करणे गरजेचे आहे. मनोरुग्ण काहीही करू शकतात याचा अंदाज आला पाहिजे. युसूफ पीरजादे याला मनोरुग्ण वॉर्डात ॲडमिट केले असते तर एका बेघराचा जीव गेला नसता असे मत नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी ‘लोकमत’शी बालेताना दिली.