बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा काळात पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेत लिंबू पाणी तसेच १ लीटर पाणी बॉटल देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ही व्यवस्था केल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारी नियोजनाबाबत पुण्यात बैठक घेतली. या बैठकीत आशीर्वाद यांनी वारी नियोजनाची माहिती दिली.
जिल्ह्यात करण्यात आलेल्या आरोग्य सुविधा, नियुक्त करण्यात आलेले आरोग्यदूत, घटना प्रतिसाद प्रणाली, आपत्ती व्यवस्थापन व मदत केंद्र याबाबत नियोजन करण्यात आले आहे. पंढरपूर शहर व परिसरात स्वच्छता, पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालय, वारकऱ्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसह स्वच्छ वारी, निर्मल वारीच्यादृष्टीने सर्व नियोजन करण्यात आले आहे, असेही आशीर्वाद यांनी या वेळी सांगितले. या बैठकीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री संत सोपान महाराज पालखी सोहळा, श्री संत निळोबाराय संस्थान, श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.