सोलापूर : भद्रावती पेठेतील श्री साईश्रद्धा संस्थेच्या नेतृत्वाखाली शहरातील ३०० साईभक्त रामनवमीनिमित्त रविवारी दुपारी ४ वाजता सायकलने शिर्डीकडे मार्गस्थ झाले. सोलापूर-शिर्डी मार्गावरुन निघालेल्या सायकल दिंडीत पालखीचेही दर्शन भक्तांना घेता येणार आहे. साईभक्तांच्या मदतीसाठी एक सायकल मेकॅनिक आणि दोन डॉक्टरही दिंडीत सहभागी झाले आहेत.
सायकल दिंडीचे हे २० वे वर्ष आहे. सोलापूरहून निघालेली ही दिंडी १३ एप्रिल रोजी म्हणजे रामनवमीदिनी शिर्डीत दाखल होणार आहे. सोलापुरातून निघालेल्या या दिंडीचा रविवारी बाळेतील श्री खंडोबा मंदिरात मुक्काम होता. सोमवारी सकाळी मोहोळमध्ये तर रात्रीचा मुक्काम शेटफळमध्ये राहणार आहे. ९ एप्रिल रोजी सकाळी माढा तालुक्यातील वेणेगाव आणि दुपारची विश्रांती पांगरेतील श्री भैरवनाथ मंदिरात राहणार आहे.
त्या रात्रीचा मुक्काम श्री कमलादेवी मंदिरात राहणार असून, दुसºया दिवशी (१० एप्रिल) निमगाव, मिरजगावमार्गे रुईछत्तीसी गावाकडे मार्गस्थ होणार आहे. गुरुवारी (११ एप्रिल) वाळूजमार्गे अहमदनगर तर त्या दिवशीचा मुक्काम शनिशिंगणापुरातील श्री शनिमंदिरात राहणार आहे. १२ एप्रिल रोजी ही सायकल दिंडी राहुरी, कोल्हारमार्गे शिर्डीत पोहोचणार आहे. दिंडीतील साईभक्तांना संस्थेच्या वतीने बरमोडा, पिवळ्या रंगाचा टी-शर्ट, टोप्या आणि भगवा ध्वज देण्यात आला आहे.
शनिवारी सकाळी ७ वाजता महाअभिषेक आणि आरती सोहळ्यात हे साईभक्त सहभागी होणार आहेत. या साईभक्तांच्या उपस्थितीत दुपारी साडेबारा वाजता गुलालाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी महाप्रसादाचा आस्वाद अन् सायंकाळी साडेसहा वाजता कालाप्रसाद आणि आरतीचा सोहळा आटोपून साईभक्त शिर्डीतच मुक्काम करणार आहेत. रविवार दि. १४ एप्रिल रोजी ही सायकल दिंडी पुन्हा सोलापूरकडे मार्गस्थ होणार आहे. सोमवार दि. १५ एप्रिल रोजी सायकल दिंडीचा समारोप होणार आहे.
फारुखने अशीही बजावली साईसेवा...- भंगाराकडे जाणाºया जुन्या सायकलींना नवा लूक देणारे मेकॅनिक फारुख सय्यद यांनी दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या शंकर गोरंडेवाले या साईभक्तास डबल चेन असलेली सायकल दिंडी सोहळ्यापर्यंत मोफत देऊन साईबाबांच्या चरणी आपली सेवा रुजू केली आहे. यापूर्वीही त्यांनी एका साईभक्तास सायकल दिली होती. यात्रेनंतर सायकल परत केल्यावर त्यांनी कुठलेच भाडे आकारत नाहीत.
२० वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे. दरवर्षी दिंडीत सायकलधारी साईभक्तांची संख्या वाढते आहे. दिंडीच्या माध्यमातून साईबाबांचे विचार रुजविण्याचा एक प्रयत्न असतो. आजपर्यंतच्या दिंडीत कधीच कसलेही अडथळे आले नाहीत, ही साईबाबांचीच कृपा म्हणावी लागेल. -विनोद मुत्यालपुजारी, साई दरबार, सोलापूर