चपळगाव : आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर माणसाने मोठी झेप घेतली आहे. सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती झाल्याने सोयीसुविधादेखील वाढल्या आहेत. पूर्वी लांब पल्ल्याचा प्रवास करताना माणूस दिशांचा आधार, विचारपूस करत प्रवासाच्या ठिकाणी पोहोचत असे; मात्र सध्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रवास करताना कोणतीही अडचण येत नाही. गुगल मॅपच्या आधारे व्यक्ती कोठूनही कोठेही अडचणीविना सुखरूप पोहोचतो़ हेच गुगल मॅप स्वामीभक्तांसाठी खर्चिक, वेळखाऊ आणि तितकेच अडचणींचे ठरले आहे.
अकलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणारे भाविक गाणगापूर आणि तुळजापूर देवीच्या दर्शनासाठी जातात. सध्या अक्कलकोट-सोलापूर, अक्कलकोट-तुळजापूर या रस्त्यांची कामे सुरू आहेत़ यापैकीच अक्कलकोट-तुळजापूर राज्य मार्गावर चपळगाव आहे. तुळजापूरला गेलेला भाविक अक्कलकोटला पोहोचण्यासाठी या मार्गाचा अवलंब करतात़ पूर्वी तुळजापूरचा भाविक सोलापूरमार्गे अक्कलकोट तीर्थक्षेत्री पोहोचत होते़ मात्र तुळजापूर-अक्कलकोट हा रस्ता झाल्याने आता याच मार्गावरून भाविकांचा प्रवास सुरू आहे; मात्र सद्यस्थितीत वेगळेच गौडबंगाल अनुभवास येत आहे.
या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. वळणावळणाचा रस्ता असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते़ यासोबतच सोलापूर-अक्कलकोट मार्गावरील कोन्हाळी फाट्यावरून भाविकांना जावे लागते़ या मार्गाने गेल्यानंतर जवळपास तासभर जादा वेळ लागत आहे. तरी संबंधितांकडून यावर तोडगा काढण्याची मागणी भाविकांमधून होत आहे.
चपळगावाजवळ भरकटतो- गुगल मॅपवर पूर्वी अक्कलकोट-तुळजापूर या मार्गावरील चपळगाव-दहिटणे-अक्कलकोट असा सोपा व जवळचा मार्ग दर्शवत होता़ मात्र गेल्या काही महिन्यांपासून तुळजापूरहून अक्कलकोटकडे निघालेल्या भाविकांनी गुगल मॅपिंग सुरू केले़ चपळगाव गावापर्यंत रस्ता योग्य दाखवतो. पुढे दहिटणे गावाजवळ तलावाशेजारी काम सुरू आहे. यासाठी वाहनांना ये-जा करण्यासाठी जुना रस्ता उपलब्ध आहे. रस्त्याच्या बांधकामाची सबब दाखवत गुगल मॅपवर चपळगावनंतर अक्कलकोटला पोहोचण्यासाठी योग्य रस्ता दाखविण्याऐवजी चपळगाव-चपळगाववाडी-दहिटणेवाडी-कोन्हाळी फाटा-अक्कलकोट असा वेळखाऊ, खर्चिक, कमी अंतरापेक्षा वाढीव अंतर आणि किचकट रस्ता दाखवत आहे़ अन्य जिल्हा, राज्यातून आलेल्या भाविकांची दिशाभूल होत आहे.
अन् रस्ता चुकलोच- अक्कलकोट-तुळजापूर रस्ता सोयीचा आहे हे ऐकून आम्ही प्रवासाला निघालो. काही वर्षांपूर्वी या मार्गावरून प्रवास केला होता़ मात्र आता येथे बदल झाले आहेत. गुगल मॅपनुसार प्रवास करताना चपळगावावरून अक्कलकोटकडे कसे जावे? या द्विधा मनस्थितीत लांबवर प्रवास करून अक्कलकोटला पोहोचावे लागले. ही बाब चुकीची असल्याची खंत अहमदनगरचे स्वामीभक्त रमेश कोंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़
अक्कलकोट-तुळजापूर रस्त्याचे काम सुरू आहे़ मात्र या मार्गावरील हन्नूर गावाजवळ रस्त्याचे काम ठप्प झाले आहे. यामुळे दूरवरून आलेल्या भाविकांना खड्ड्यातू प्रवास करावा लागत आहे. तसेच चपळगावावरून अक्कलकोटला जाण्यासाठी वेगळाच मार्ग दाखवतो़ प्रवाशांची दिशाभूल होते़- विश्वनाथ भरमशेट्टीनागरिक, हन्नूर
सोयीसुविधा वाढल्याने अक्कलकोटला येणाºया भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तुळजापूरहून अक्कलकोटच्या दिशेने येणारे भाविक जर गुगल मॅपमुळे त्रस्त होत असतील तर संबंधिताकडे पाठपुरावा करु़ - महेश इंगळे,चेअरमन, स्वामी समर्थ देवस्थान, अक्कलकोट