श्रीपूर : टाळ मृदंगाचा गजर, माऊली.., माऊली.., नामाचा अखंड जयघोष करीत माळशिरस तालुक्यातील श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सर्वात मोठ्या उभ्या व गोल रिंगणात अश्व नेत्रदीपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडतात. यंदा मात्र हा नयनरम्य सोहळा कोरोनाच्या संकटामुळे होणार नसल्याने लाखो भाविकांना रिंगण सोहळा पाहण्यास मुकावे लागणार असल्याचे शरद पोळ, शहाजी मांडवे, विजयकुमार शेळके, बळीराम पोखरे आदी भाविकांनी सांगितले.
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून यंदा आषाढी एकादशीची वारी अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी संतांच्या पादुका वाहनाने पंढरपूरला नेल्या जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे. जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारी ३३५ व्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी श्रीसंत तुकाराम महाराज संस्थान सज्ज झाले आहे. अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा पार पडला.जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात अकलूज येथे गोल रिंगणाचा नयनरम्य सोहळा पार पडतो. तो सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक एकत्र येतात. आसमंत व्यापून टाकणारा टाळ मृदंगाचा गजर..., माऊली..., माऊली..., नामाचा अखंड जयघोष करीत सर्वात मोठे म्हणून ओळखल्या जाणाºया उभ्या व गोल रिंगणात अश्वांनी नेत्रदीपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडतात.
श्रीसंत तुकाराम महाराज यांच्यासह भागवत धर्माची पताका उंचावत सुमारे लाखो वैष्णवांसह महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून आलेले संतांचे पालखी सोहळे या रिंगण सोहळ्यासाठी अकलूजमध्ये दाखल झालेले शेकडो भाविक नयनरम्य रिंगण सोहळा पाहण्यासाठी अकलूज येथे पोहोचतात. अवघी अकलूजनगरी विठुनामासह माऊली..., माऊली...च्या जयघोषाने दुमदुमून जाते. दुसºया दिवशी माळीनगर येथे पहिला उभा रिंगण सोहळा पार पडतो.
आषाढी वारीची परंपरा खंडित नाही- स्वातंत्र्यपूर्व काळात प्लेग साथीमुळे तसेच अन्य कारणांमुळे आषाढी वारीच्या परंपरेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पायी वारी खंडित झाल्याची नेमकी नोंद नसली तरी एक-दोनदा ही परिस्थिती निर्माण झाली होती. असे संदर्भ असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. यंदा पायी वारी जाणार नसली तरी पादुका नेल्या जाणार आहेत. त्यामुळे वारीची परंपरा खंडित होणार नाही, असे देहू संस्थानचे माजी अध्यक्ष बापू महाराज मोरे-देहूकर यांनी सांगितले.
वेळ, ठिकाण नियोजन असते निश्चित- पालखी सोहळ्यातील विशेष आकर्षण रिंगण सोहळा असतो. परंपरेनुसार वाटचालीत प्रवासात लाखो वारकºयांना मनमुराद आनंद लुटण्यासाठी रिंगण सोहळा घेतला जातो. पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळ्यात उभे रिंगण व गोल रिंगण असे दोन प्रकार असतात. रिंगण सोहळ्याचे वेळापत्रक, ठिकाण, वेळ सर्व निश्चित व नियोजित असते. रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी वारकरी व सर्व पालख्या, दिंड्या एकत्र येतात. ठरलेल्या वेळेनुसार व क्रमाने दिंड्या चालत असतात.