मोहन डावरे
पंढरपूर - गरिबांचा देव म्हणून परिचित असलेल्या विठुरायाची आषाढी एकादशी उद्या मंगळवारी आहे. माञ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे याञा सोहळ्यावर निर्बंध आले आहेत. मोजकेच भाविक व प्रमुख दहा पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भाविकांविना संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सह रुक्मिणी माता, सोपान काका, एकनाथ महाराज, चांगावाटेशवर, संत मुक्तबाई आदी पाच पालख्या वाखरी पालखी तळावर विसावले आहे.
याञा सोहळ्यातील शेवटचा मुक्काम वाखरी पालखी तळावर संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज या प्रमुख संतासह अन्य संताच्या पालख्यांचा असतो. यामुळे प्रत्येकवर्षी लाखो भाविकांची गर्दी या पालखी तळावर असते. माञ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी विसावली.
पालखी तळावर पालख्या आल्यावर सर्व भाविकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.त्यानंतर भाविक हिरव्यागार तळावर विसावा घेत आहेत. त्यानंतर भोजन, भजन कीर्तनात भावीक तल्लीन होत आहेत. भाविक मोजके असूनही उत्साह कणभर ही कमी दिसत नाही.
यावेळी प्रशासनाच्या वतीने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, सह अध्यक्ष गहिनाथ महाराज औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, माधवी निगडे आदी उपस्थित होते.