करमाळा तालुक्याला कुस्तीची परंपरा आहे. तालुक्यातील ११८ गावांसह वाड्यावस्त्यांवर लोकसहभागातून तालीम बांधण्यात आलेल्या आहेत. जवळपास चार ते पाच हजार पैलवान या सर्व तालमीत दैनंदिन सराव करतात. तालुक्यात केम, जेऊर, वांगी, जिंती, देवीचामाळ, साडे, सालसे, आवाटी, कंदर, चिखलठाण, पांडे या गावांतील यात्रा, जत्रा व उरुसानिमित्त भव्य कुस्त्यांचे आखाडे भरवले जातात. यात्रा, जत्रा व उरुसानिमित्त होणाऱ्या कुस्त्याच्या स्पर्धांतून हे सर्व पैलवान आपला खुराक भागवतात.
कोरोना संसर्गाने गतवर्षी व यंदाच्या वर्षी कुस्त्यांचे आखाडे भरविले गेले नसल्याने पैलवानांचे आर्थिक रसद बंद पडली आहे. परिणामी, पैलवान मंडळी आर्थिक संकटात सापडली आहे. एक तर कोरोनाच्या भीतीने सराव बंद आहे. त्यातच कुस्त्यांचे आखाडे भरविले जात नसल्याने पैलवानांसमोर ‘इकडे आड, तिकडे विहीर’ असा पेच निर्माण झाला आहे. खुराकासाठी घरासमोर किती वेळा हात पसरावेत याचीही लाज पैलवानांना वाटू लागली आहे.
----
पैलवानांची परंपरा...
करमाळा तालुक्यातील जेऊरवाडीचे चंद्रहास निमगिरे व खडकी च बालारफी शेख हे दोघे महाराष्ट्र केसरी झाले, तर करमाळ्यातील विकी जाधव उपमहाराष्ट्र केसरी, तर लव्हे येथील अतुल पाटील डबल उपमहाराष्ट्र केसरी बनले होते. माजी आ. नारायण पाटील, पं.स.चे उपसभापती दत्ता सरडे, अफसर जाधव महाराष्ट्र चॅम्पियन होते. स्व. अण्णासाहेब जगताप, नामदेवराव जगताप, दिगंबरराव बागल, गोविंदबापू पाटील यांनी कुस्तीला राजकीय आश्रय मिळवून दिला.
--------
खुराकासाठी मदत करा
एका मल्लास खुराक व सरावसाठी महिन्याला साधारण २० हजार रुपये खर्च येतो. यात्रा, जत्रा व उरुसानिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्तीच्या आखाड्यातून मिळणाऱ्या बक्षीस रकमेतून गरीब पैलवान हा खर्च भागवतो. काही मल्ल तर या बक्षीस रकमेवरच विसंबून आहेत. स्पर्धा होत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. शासनाने अथवा दानशूर व्यक्तींनी मल्लांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र केसरी बालारफी शेख यांनी केली आहे.
----
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने कुस्ती स्पर्धांचा दुसरा सिझनही जात आहे. त्यामुळे पैलवानांसमोर आर्थिक अडचण निर्माण होऊ लागली आहे. आयपीएलची स्पर्धा होते. मात्र, कुस्तीचे आखाडे होत नाहीत. प्रेक्षकांशिवाय कुस्तीच्या स्पर्धा व्हाव्यात.
-अतुल पाटील, डबल उपमहाराष्ट्र केसरी
१७करमाळा
कोरोना संसर्गामुळे कुस्तीचे आखाडे ओस पडले आहेत.