प्रत्येक वर्षी माघ यात्रेला कर्नाटक, आंध्रप्रदेशसह देशभरातून पाच लाखांच्या आसपास भाविक पंढरपुरात येतात. मात्र, गेल्या मार्च महिन्यापासून कोविडचा प्रादुर्भाव सुरू आला आणि विठ्ठल - रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे चैत्र, आषाढी, कार्तिकी यात्रा रद्द करण्यात आल्या. डिसेंबरपासून कोविडचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झाल्यानंतर विठ्ठल मंदिर मुखदर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात आले होते. त्यामुळे यंदाची माघी यात्रा प्रत्येक वर्षीप्रमाणे विठू नामाचा जयघोष करत उत्साहात साजरी होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य भाविकांना होती.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोलापूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, त्यांनी पंढरपूरची माघ यात्रा रद्द करत २४ तासांची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे भाविकांच्या उत्साहावर विरजन पडले. ही यात्रा रद्द झाल्याने गेल्या वर्षभरात लहान मोठ्या व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठा समजला जाणारा जनावरांचा बाजारही रद्द झाल्याने मंदिर समितीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
आदेशाचे पालन करा अन्यथा गुन्हा
माघी यात्रेत गर्दी होऊन काेरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. यासाठी २२ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजल्यापासून ते २३ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत संचार बंदी करण्यात आली आहे. या आदेशाचे कोणी पालन केले नाहीतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.
फोटो ::::::::::::::::::::::
माघी यात्रा असूनही विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीजवळच्या परिसरात गर्दी दिसत नाही. (छाया : सचिन कांबळे)