- दीपक दुपारगुडे
सोलापूर : सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर चार येथील रवींद्र गायकवाड आपल्या पत्नीच्या निधनानंतर पत्नीच्या नावे असलेले बँक खाते बंद करायला गेले असता बँक खात्यात दोन लाख रुपये जमा असल्याचे पाहून पती आणि लेकरांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. रवींद्र गायकवाड यांची पत्नी शिल्पा गायकवाड या रेल्वे स्टेशनमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होत्या. गायकवाड कुटुंबाची परिस्थिती ही हलाखीची.
दरम्यान शिल्पा गायकवाड यांचे सात रस्ता परिसरातील भारतीय स्टेट बँकेमध्ये बँक खाते आहे. त्या खात्यामध्ये काही तरी पैसे शिल्लक असेल जेणेकरून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होईल या आशेने पती रवींद्र गायकवाड बँक खाते बंद करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना खात्यात दोन लाख रुपये जमा असल्याचे समजल्यानंतर गायकवाड यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
तीनही मुलींच्या नावे करणार एफडी-
रवींद्र गायकवाड यांना तीन मुली व एक मुलगा आहे. भविष्यात मुलींच्या लग्नासाठीचा किंवा शिक्षणासंदर्भात लाभ घेता येईल या उद्देशाने ही मिळालेली रक्कम तीन मुलींच्या नावाने एफडी करण्यात येणार असल्याचे शाखा अधिकारी यांनी रवींद्र गायकवाड यांना सांगितले.
कसे आले दोन लाख-
पत्नीने बँकेमध्ये खाते उघडते वेळेस प्रधानमंत्री जीवन विमा काढला होता. आज अनेकांना या योजनेबाबत माहिती नाही. योजनेंतर्गत, कोणत्याही कारणामुळे विमाधारकाचा मृत्यू झाल्यास जोखीम संरक्षण रक्कम दोन लाख रुपये आहे. प्रीमिअम रक्कम वार्षिक रु. ४३६ आहे.
स्टेटमेंट चेक केले असता त्यांचे खाते सुरू करताना प्रधानमंत्री जीवन विमा काढलेले निदर्शनास आले. प्रधानमंत्री जीवन योजनेमध्ये वर्षाला ४३६ रुपये आपल्या बँक खात्यातून वर्ग केले जातात. खाते धारकाचे निधन झाले तर वारसाला. दोन लाख रुपये मिळतात. - विशाल गायकवाड, शाखा अधिकारी, सातरस्ता
माझ्या पत्नीच्या निधनानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैशांची अडचण असल्यामुळे पत्नीचे बँक खाते बंद करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा समजले की खात्यात दोन लाख रुपये आहेत. आता माझेदेखील खाते उघडून त्या योजनेसाठी अर्ज केला आहे. - रवींद्र गायकवाड