सोलापूर : कोरोनाच्या काळात शहरातील खासगी रुग्णालयांनी शासन निदेर्शानुसार बिल आकारणी करावी, रुग्णांना तत्काळ बेड उपलब्ध व्हावेत यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून धडपणारे स्थानिक निधी वित्त विभागाचे सहायक संचालक धनराज पांडे यांची महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मनपाचे उपायुक्तपद दीड वर्षापासून रिक्त आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांच्याकडे उपायुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे. स्थानिक निधी वित्त विभागाचे सहायक संचालक धनराज पांडे गेली तीन वर्षे सोलापुुरात कार्यरत आहेत. मार्चअखेर त्यांची बदली होणार होती. कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्यानंतर महापालिकेच्या कोवीड नियंत्रण १९ कक्षाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्यानंतर मनपातील काही अधिकारी काम करायला तयार नव्हते. दीड वर्षापूर्वी उपायुक्तपदी नियुक्त झालेले अभिजित बापट अद्यापही रुजू झाले नव्हते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागला. इतर विभागातील अधिकारी कामास नकार देत होते. खासगी रुग्णालये रुग्णांना दाखल करुन घेण्यास नकार देत होती. या काळात पांडे यांची नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली. सर्व गोष्टींना शिस्त लावण्याचे काम पांडे यांनी नियंत्रण कक्षातून केले. पांडे यांची वित्त विभागातून प्रतिनियुक्तीने महापालिका उपायुक्तपदी बदली व्हावी यासाठी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रस्ताव पाठविला होता. त्याला यश आले आहे.