आप्पासाहेब पाटील, सोलापूर : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. २४ व्या फेरीअखेर ते अडीच लाखांच्या मताधिक्क्याने आघाडीवर आहेत. अंतिम निकाल हाती येणे बाकी असून विजयी घोषित अद्याप निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून ओमराजे निंबाळकरांना ५५ हजाराचा लीड मिळाला आहे.
दरम्यान, ओमराजेंच्या विजयाबद्दल बार्शी तालुक्यातील वैराग येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितीचे माजी सभापती मकरंद निंबाळकर, रवी पांढरमिशे, अहमद शेख, समीर शेख , मनोज वाघमारे आदींसह कार्यकर्ते यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष केला. बार्शी तालुक्यात माजी आमदार दिलीप सोपल यांनी ओमराजेंच्या विजयासाठी मोठे प्रयत्न केले. अजित पवार गटाच्या अर्चनाताई पाटील यांना ३ लाख ३८ हजार २३५ मते मिळाली आहेत. ओमराजें निंबाळकर व अर्चना पाटील यांच्या अटीतटीची लढत झाली हाेती. ओमराजेंच्या प्रचारार्थ उध्दव ठाकरे यांनी सभा घेतली होती. या सभेला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.