मोहोळ : आजीला मिळालेल्या जमिनीवर वारसा हक्काने एकुलत्या एक मुलाची वारस नोंद असताना त्याच्या चुलत भावाने गावकामगार, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीसपाटील, कोतवाल यांना हाताशी धरून उतारऱ्यावर सात जणांची बोगस नोंद केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंडळ अधिकारी, तलाठ्यासह १३ जणांवर मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना तालुक्यातील ढोक बाभळगाव येथे घडली असून, पोलिसांनी ढोक बाभळगावचा कामती विभागाचा मंडळ अधिकारी सुनील केरबा बेलभंडारे, ढोकबाभळगावचा तलाठी सिद्धेश्वर हरिविजय नकाते, ग्रामसेवक मिलिंद कृष्णाजी तांबिले, महिला सरपंच रुक्मिणी राजाराम पांढरे, कोतवाल राजेंद्र जालिंधर कुंभार यांच्यासह माजी सरपंच बंडू शंकर मुळे, विकास गंगाराम बेलेराव, तानाजी दशरथ बेलेराव, सरूबाई शिवाजी बेलेराव, रुक्मिणी सतीश माने, जनाबाई गंगाराम बेलेराव, जनार्दन गंगाराम बेलेराव, संगीता शिवाजी सुरवसे या १३ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार, देवीदास मनोहर बेलेराव यांची आजी अफ्रुका लक्ष्मण बेलेराव हिला शासनाकडून गायरान जमीन मिळाली होती. अफ्रुकाच्या मृत्यूनंतर या जमिनीवर त्यांचा नातू देवीदास मनोहर बेलेराव यांचे नाव लागले. असे असताना देवीदास बेलेराव यांचे चुलत भाऊ विकास बेलेराव याने १ जुलै २०२१ रोजी त्या जमिनीवर भावांची नावे लावावीत म्हणून तलाठ्याकडे अर्ज केला होता. त्या अर्जानुसार ढोकबाभळगावच्या तलाठ्याने बोगस नोटीस काढली. तसेच फिर्यादीची आजी अफ्रुका ही सोलापूर येथे मयत झाली असताना ती ढोकबाभळगाव येथे मयत झाल्याचा खोटा दाखला ग्रामसेवकाकडून घेतला. याबरोबरच ढोकबाभळगावचे सरपंच, पोलीसपाटील, कोतवाल या सर्वांना हाताशी धरून खोट्या सह्या व बोगस दाखले बनवून इतर सात जणांची नावे वारसदार म्हणून नोंद केली. याप्रकरणी देवीदास बेलेराव यांनी फिर्याद दिली आहे.
अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधीर खारगे करीत आहेत.