वैराग : गत पंधरा दिवसांत पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे हिंगणी ६५ टक्के, जवळगाव ८६ टक्के, लाडोळे ६० टक्के, तर शेळगाव ६८ टक्के भरले आहे. तर ढोळ पिंपळगाव धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये आंनदाचे वातावरण आहे.
बार्शी तालुक्यातील हिंगणी मध्यम प्रकल्प सर्वात मोठे असून, १६५० दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता आहे. सुमारे सात हजार एकर जमीन भिजते आणि यातून शासनाला अठरा ते वीस लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. तर जवळगाव मध्यम प्रकल्पाची क्षमता १२३० दशलक्ष घनमीटर असून, सहा हजार एकर जमीन भिजते गत महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने पूर्वा नक्षत्रात समाधानकारक हजेरी लावल्याने पिकेदेखील जोमात आली आहेत. असाच पाऊस राहिला तर पंधरा दिवसांत सर्व धरणे भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कॅनलमार्गे व उचल पाणीधारकात समाधानकारक व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर या पावसाने काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिके वाया गेली असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहेत. त्याचबरोबर ढाळे पिंपळगाव १०० टक्के भरले असून, याचादेखील वैराग भागातील शेतीला मोठा फायदा होतो. त्यामुळे या तिन्ही प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाल्याने तसेच या परिसरात द्राक्षे, ऊस, लिंबू, आंबा आदी बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.
............................
३५ हजार एकर जमीन ओलिताखाली येणार
त्याच बरोबर धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे हिंगणीमध्ये प्रकल्पावरील बावीस, जवळगावमध्ये प्रकल्पावरील तेरा गावांचा तर शेळगाव मध्यम प्रकल्पातून काही गावांचा पाणी प्रश्न सुटला असून पाच तालुक्यातील सुमारे सत्तर गावातील तीस ते पस्तीस हजार एकर जमीन उन्हाळ्यात ओलिताखाली येणार आहे.