मंगळवेढा - अंधाराचा फायदा घेऊन मंगळवेढा उपकारागृहातुन एका कैद्यांने पलायन केले, मात्र मंगळवेढा पोलिसांच्या सहा पथकांनी तपासाची चक्रे गतिमान करीत मारोळी या गावी चालत निघालेल्या कैद्यांला दोन तासांच्या आत खोमनाळ रोडवर जेरबंद केले. शुक्रवार ४ रोजी सायंकाळी जोरदार पाऊस झाल्याने व जेलमधील लाईट गेल्याने सर्व कैद्यांना लॉकअप मधून काढून लॉकअप समोरील व्हरांड्यात सोडले होते त्यावेळी आरोपी आनंदा तुकाराम होनमुर्गी ( वय 35 रा मारोळी ) याने अंधाराचा फायदा घेऊन जेल च्या पाठीमागे असलेल्या संरक्षण भिंतीवरील तारेचे कुंपण असलेल्या लोखंडी अंगेंलला रबरी पाण्याचा पाईप अडकवून त्याचा आधार घेऊन जेलमधील भिंतीवर सोडून उडी टाकून पळून जाण्यात यशस्वी झाला.
पाऊस कमी झाल्यानंतर आरोपी पूर्ववत जेलमध्ये पाठवताना संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी मोजले असता एक आरोपी कमी आढळून आला त्यावेळी त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांना दिली. पो नी गुंजवटे यांनी तात्काळ सहा पोलिस पथके तैनात करून तालुक्याच्या विविध भागात पाठविले या पथकाने मंगळवेढा शहरासह आजुबाजुस संबंधित आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली, यादरम्यान त्यांना शहरातील खोमनाळ रोड येथील ताड कॉलेजच्या समोर रात्री दहा वाजता संबंधित कैदी चालत चालल्याचे दिसून आले. या दरम्यान पोलिसांच्या पथकाने जागी झडप घालून पकडले व त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले सदर आरोपी हा खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील होता पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या या कामगिरीबद्दल डी वाय एस पी पाटील व पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी त्यांचे अभिनंदन केले.