उत्तर सोलापूर : बीबीदारफळ परिसरात धुवाधार पडलेला पाऊस मात्र शेजारच्या वडाळा गावात जेमतेम पडला आहे. असे असले तरी उत्तर सोलापूर तालुक्यात सरासरी १५२.७ टक्के इतकाच पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. एक जूननंतर ६ जुलैपर्यंत जेमतेमच पडला. त्यानंतर मात्र तालुक्याच्या काही गावांत धुवाधार, तर काही गावांत जेमतेम पाऊस पडत आहे.
बीबीदारफळ, अकोलेकाटी, कोंडी, रानमसले, कौठाळी या गावांना सलग १५ दिवस पावसाने झोडपून काढले आहे. मात्र हाच पाऊस वडाळा, गावडीदारफळ या गावात जेमतेम पडत आहे. बीबीदारफळ गावात सलग अधिक प्रमाणावर पाऊस पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र वडाळा परिसरातील सोयाबीन, मका, उडीद व इतर पिकांची वाढ जोमात सुरू आहे. बीबीदारफळ व वडाळा या दोन्ही गावांतील अंतर केवळ ११ किलोमीटर आहे. एवढ्या कमी अंतरात एका गावात नुकसानकारक, तर दुसऱ्या गावात जेमतेम पाऊस पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
----
खुरपण... कोळपण अन् किचकिच..
जेमतेम पाऊस पडल्याने वडाळा गावात रविवारी सोयाबीन व इतर पिकांची खुरपण व कोळपणी सुरू होती. इकडे बीबीदारफळ गावाच्या संपूर्ण शिवारात पाणीच पाणी झाल्याने किचकिच दिसत होती. बीबीदारफळ शिवारातील दोन्ही ओढ्यांवरील बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत.
----
उत्तर सोलापूर तालुक्याचा २४ जुलैपर्यंतचा सरासरी पाऊस २१६ मि.मी. इतका असताना, ३३० मि.मी. म्हणजे १५२.७ टक्के पडला आहे. वडाळा मंडलात २९४ मि.मी., मार्डी मंडलात ३१९ मि.मी., तर तिर्हे मंडलात ३०७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बीबीदारफळ गावात सर्वाधिक ३७३ मि.मी. पाऊस पडला आहे.
----
फोटो : २५ बीबीदारफळ