सोलापूर: पालकमंत्री शिवसैनिकांना विश्वासात घेत नाहीत. अनेक दिवसानंतर आज ते दिसले, अशा शब्दात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मामा असे करु नका, सर्वांना सोबत घ्या. आपले महाविकास आघाडीचे सरकार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्र्यांना सांगितले.
पावसामुळे अक्कलकोट तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांचे सकाळी साडेनऊला सोलापुरात आगमन झाले. सोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर होते. यादरम्यान बरडे यांची विचारपूस करताच त्यांनी पूरस्थितीची माहिती देऊन पालकमंत्र्यांबद्दलही तक्रार केली. पुरुषोत्तम आमचा जुना कार्यकर्ता आहे. त्यांना सोबत घ्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले. परवा बैठक घेणार होतो पण पावसामुळे रद्द करावी लागली, असे उत्तर भरणे यांनी दिले.
मनपासाठी स्वतंत्र बैठक - नगरसेवकांना विशेष निधी मिळावा, यासाठी आ. प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, चेतन नरोटे, विनोद भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. असा विशेष निधी मागण्याऐवजी ठराविक कामे सांगा. प्रणिती तू महापालिकेचे प्रश्न घेऊन सर्वांसोबत मुंबईत ये, आपण स्वतंत्र बैठक घेऊ, असेही ठाकरे म्हणाले.