राजकुमार सारोळे
सोलापूर : थेलीयमचा विषप्रयोग करून मला संपविण्याचा प्रयत्न केला गेला, पण माझे कुटुंब व मित्रपरिवाराच्या पाठबळाने ११ महिने मृत्यूशी झुंज दिली. आता एकच मागणी आहे ती म्हणजे माझा ‘गेमप्लॅन’ करणाºयांचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी प्रतिक्रिया नगरसेवक सुरेश पाटील यांनी ‘लोकमत’शी दिली.
सुरेश पाटील मित्रपरिवारातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पाटील यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाच्या सीआयडी चौकशीचे काय झाले? या प्रकरणातील खरे गुन्हेगार शोधून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे द्या, अशी मागणी करण्यात येत आहे. ५ डिसेंबर २0१७ रोजी सायंकाळी महापालिकेतून घरी परतल्यावर त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर काय घडले याबाबत पाटील यांच्या तोंडून घडामोडी जाणून घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊन संवाद साधला. पायाला मुंग्या येत आहेत म्हणून शुगरमुळे पॅरेलेसीसची लक्षणे असावीत असा अंदाज करून त्याप्रमाणे डॉक्टरांनी उपचार सुरू केले. पण फरक न पडता जुलाब होऊन पाय लुळे पडल्याने आजार वाढत गेला. डॉक्टर म्हणाले की मी यातून वाचणे शक्य नाही. त्यामुळे पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले. येथेही त्याचपद्धतीने उपचार सुरू राहिल्याने प्रकृती आणखी चिंताजनक बनत गेली. तेथून पुन्हा मुंबईला हलविण्यात आले.
बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आजाराचे खरे निदान झाले. द्रव्य पदार्थातून थेलीयम देण्यात आल्याचे उघड झाले. डॉक्टरांच्या माहितीवरून पोलिसांनी एमएलसी नोंद केली. शरीरात नसानसात भिनलेले थेलीयम बाहेर काढण्यासाठी सहा महिने गेले. मी संपलो अशी चर्चा होती. या काळात अनंत यातना मला सहन कराव्या लागल्या. माझा मुलगा बिपीन, पुतण्या अक्षय आणि पत्नी उषा रात्रंदिवस माझी सेवा करीत होते. कितीतरी दवाखाने बदलले. मी यातून वाचेन असे कोणालाही वाटत नव्हते. पण आज मी यातून बाहेर पडलो आहे. आता मला फक्त चालता येत नाही. त्यासाठी फिजीओथेरपी सुरू आहे. मला विश्वास आहे की मी पुन्हा त्याच ताकदीने महापालिकेत एन्ट्री मारेन.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सीआयडी तपासाची घोषणा केली. पण पुढे काय तपास झाला माहीत नाही.
मित्रमंडळींचा आज मोर्चासुरेश पाटील यांना न्याय द्यावा या मागणीसाठी मित्रमंडळींतर्फे बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा भवानीपेठेतील पाटील यांच्या संपर्क कार्यालयापासून जय भवानी मैदान, बलिदान चौक, सराफ कट्टा, माणिक चौक, विजापूर वेसमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे.
केस, नखामुळे झाले निदान- बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान विषबाधेचा प्रकार उघड झाला. डॉक्टर विविध चाचण्या करीत होते. माझ्या डोक्याचे केस गळत आहेत. बोटांच्या नखांचा रंग बदललेला पाहून डॉक्टरांचा संशय बळावला. त्यामुळे केस आणि नखे काढून तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविली. पहिली चाचणी पॉझीटीव्ह आल्यावर पुन्हा एकदा खात्री करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी माझ्यावर थेलीयमचा विषप्रयोग करण्यात आल्याचे सांगितले.
थेलीयम आले कोठून ?थेलीयम हे विषारी द्रव्य सहसा बाजारात उपलब्ध होत नाही. अत्यंत शांत डोक्याने व योजनाबद्ध रितीने हा कट रचला गेला असावा असे मला वाटते. त्यामुळे थेलीयम सोलापुरात कसे आले याचा शोध जर पोलिसांनी घेतला तर प्रकरण धसास लागेल, अशी सुरेश पाटील यांची मागणी आहे. अकरा महिन्यांत माझे कुटुंब डिस्टर्ब झाले. ९0 लाख खर्च झाले.
पोलीस म्हणाले जबाब द्यामुख्यमंत्री सोलापूर दौºयावर असताना पोलीस माझ्याकडे आले व जबाब द्या म्हणून आग्रह धरला. अद्याप माझी मानसिकता नाही असे म्हटल्यावर तसे लिहून द्या म्हणत होते. मी बरा होत आहे. योग्य वेळ आली की सर्व माहिती सांगेन असे पोलिसांना सांगितल्याचे सुरेश पाटील म्हणाले.