सोलापूर/मुंबई - काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... या आपल्या माणदेशी बोलीतील संवादामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आमदार शहाजी बापू पाटील यांचं त्यांच्या सांगोला या मूळगावी आज जल्लोषात स्वागत झालं. तब्बल 15 दिवसांनी आमदार पाटील त्यांच्या सांगोला मतदारसंघात परतले आहेत. त्यावेळी मोठ्या जल्लोषात गावकऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. हलगीच्या तालावर, फटक्यांची आतिषबाजी झाली. यावेळी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार 15 वर्षे टिकणार असे भाकीत केले. त्यावेळी, त्यांच्या पत्नी रेखाताई पाटील याही पतीच्या स्वागताला हजर होत्या. यावेळी, त्यांनी काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.. म्हणत डाललॉगबाजी केली.
शिवसेनेतील बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांचा आपल्या कार्यकर्त्याशी फोनवरुन झालेला संवाद तुफान व्हायरल झाला होता. गुवाहाटीत असताना त्यांनी रफीक नावाच्या त्यांच्या माजी नगराध्यक्ष असलेल्या मित्राला केलेल्या संभाषणातील काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... हे वाक्य तुफान गाजलं. अनेकांनी या डायलॉगवरुन मिम्स आणि गाणीही वाजवली. आता, तब्बल 15 दिवसांनी त्यांनी मतदारसंघात पाय ठेवले. त्यावेळी, त्यांच्या पत्नी रेखा यांनी औक्षण करुन त्यांचं स्वागत केलं. तर, काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... समदं ओक्के, शिंदेसाहेब मुख्यमंत्री ओक्के... असा डायलॉगही मारला. तर, पत्रकारांच्या आग्रहास्तव उखाणाही घेतला.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचा मला आनंद आहे, आता सगळं ओक्के वाटतंय. आता मलाही घेऊन ते गुवाहाटीला जाणारंय की, असेही रेखा यांनी म्हटले. तसेच, आशील तिथं मुलीने नम्रतेने वागावे, शहाजी बापूंसारखा पती मिळाल्यावर देवाकडे आणखी काय मागावे... असा उखाणाही घेतला. तर, अगोदरची परिस्थिती हालाखीचीच होती, अशी आठणही सांगितली. दरम्यान, आमदार शहाजी बापू पाटील यांना कार्यकर्त्यांनी गराडा घातला होता. त्यावेळी, कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं होतं. फटाक्यांची आतिषबाजी आणि हलगीच्या तालावर कार्यकर्ते सांगोल्यात नाचताना दिसून आले.
हे सरकार 15 वर्षे राहणार
गुवाहाटीच्या दौऱ्यासंदर्भात शहाजी बापूंना प्रश्न केला असता, मी चार-4 महिने घराबाहेर असायचो, माझी बायकोही माझ्या नावानं बोंबलायची. गुवाहाटीला एकनाथ शिंदेंचा मावळा म्हणून मी कालची लढाई करत होतो. पण, आमच्या या लढाईत मी एक सेकंदही विचलित झालो नाही. एकनाथ शिंदेंना पांडुरंग मुख्यमंत्री करणार हे मला माझा देव सांगत होता. शिंदे-फडणवीस सरकार नक्कीच चांगलं काम करेल, असा मला विश्वास आहे. शरद पवारांचा काय आपल्याला नवा अनुभव आहे व्हय, 35 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे आपल्याला. हे सरकार अडीच वर्षे पूर्ण करेल, पण पुढील 15 वर्षे हेच सरकार राहणार, असल्याचं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं.
संजय राऊतांची केली नक्कल
संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना शहाजी पाटील म्हणाले की, माझी त्याची ओळख नाय, गेल्यावर सांगणारंय. त्याचं मनगट हलतंय आणि सारखं वर करतंय ह्यों, ह्मं त्यों गेलाय... कापून काढू, प्रेतं आणू... आरं लका कुणाची प्रेतं, कुणाला कापतो, तुझं तुला चालया येईना, असे म्हणत शहाजी पाटील यांनी संजय राऊतांची थेट जाहीर सभेत नक्कल केली. तसेच, सकाळी बशीभर पवं खातंय अन् घरातनं बाहेर पडतंय. झोपताना एक चपाती खाऊन झोपतंय. लका, ये आमच्याकडे कसं बोकाड परपायचं असतंय अन् कोंबडी कशी तोडायची असती मग मनगटात रग येते. ज्याच्या मनगटात रग येते, त्यानेच बोलायचं असतंय, असे म्हणत शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टिका केली.