- समीर इनामदार
निवडणुका आल्या की, अनेकांना जोश येतो. गेल्या पाच वर्षांपासून साठविलेला उत्साह आता एकदमच सांडतो की काय, अशी स्थिती काही जणांची झालेली असते. गल्लीबोळातली बित्तंबातमी आपल्यालाच कशी आहे आणि ती कधी एकदा लोकांना सांगतो, असं अनेक जणांना झालेलं असतं. सकाळी झोपेतून उठल्यानंतर चहा पिऊन थेट काही जण तालुक्याच्या ठिकाणी तर काही जण निवडणूक कार्यालयात पोहोचतात. नवीन काय खबर... काय म्हणतंय वातावरण हेच आता सगळीकडे ऐकू यायला लागतं. चहाच्या टपरीवर, पारावर आणि बसमध्ये याशिवाय दुसरी चर्चाच नाही. आता शहर आणि जिल्ह्यात बºयापैकी पाऊस झालेला असल्याने पावसाने होणाºया काळजीची चर्चा जरा कमी झालीय.
आता निवडणुकीची चर्चा हळूहळू सुरू होतीय. हलगी गरम झाल्याशिवाय वाजत नाही, तशी चर्चांची हलगी हळूहळू गरम व्हायला लागलीय. मात्र अजून हवा तसा ‘जाळ’ लागला नाही. त्यामुळे अनेकांना असा ‘जाळ’ लावायची हौस असते. त्यामागचे त्यांचे कारण म्हणजे त्यांचे दुकान चालू शकत नाही. समोरचा एका पार्टीचा आहे म्हटलं की त्याच्याविरुद्ध बोलायचे आणि त्याला रागाला आणून त्याच्याकडून आपल्याला हवं ते काढून घ्यायची काही जणांची पद्धतच असते. ‘लावा शर्यत’ हे वाक्य तुम्हाला आता प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळणार. काहीही झालं तरी ‘लावा शर्यत’ अशी काहींची दिवसभराची दिनचर्याच असते. हा कसा या उमेदवाराच्या विरुद्ध आहे, तो कसा शेवटी पलटी मारणार किंवा ठराविक भागाची मोळी कशी बांधायची यात तो कसा हुशार आहे, असं आपल्या नेत्याचं कौतुक करण्यात अशी मंडळी दिवसभर कामाला लागलेली असतात.
फेसबूक किंवा व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमात हल्ली आपल्याला ट्रोलिंगची स्थिती दिसते. मात्र असं ट्रोलिंग करण्यात काही जण वर्षानुवर्षे माहीर असतात. अशा बिनकामाच्या पण कामाला येणाºया मंडळींना काही नेतेमंडळी हाताशी धरून असतात. ‘गटारीचं पाणीही कधी कधी आग विझवायला कामी येतं’ असं म्हणत अशा लोकांना आपल्या पदरी ठेवण्याचं कौशल्य नेतेमंडळींमध्ये असते. अशी ही मंडळी मग निवडणुकीच्या निमित्तानं सर्वत्र आपल्या विरुद्धचा उमेदवार ‘न्हेलं साठवलेलं गं गाठोडं बया, केलं पब्लिकचं गं वाटुळं बया’ अशी गाणं म्हणत असतात. सगळ्याच नेत्यांकडे अशी माणसं असतात. मग दबलेली, पिचलेली मतदार मंडळी अशा नेत्यांना विरोध न करता ‘अगदी ढिम्म चेहरा करून तुम्ही सांगताय तेच कसं खरं हाय आणि आम्हाला हे माहिती नव्हतं बुवा’ अशा पद्धतीने ऐकत असतात. ‘असं व्हय’ म्हटलं की मग अशा निवडणुकीपुरत्या ‘व्हाईट कॉलर’ नेत्यांना अंगावर मूठभर मांस चढतं. मग २१ तारखेला बघाच किंवा २४ ला गुलाल आपलाच असं सांगत असताना जणू मतदार हा ‘उरलो आता बटन दाबण्यापुरता’ अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहत असतो.काही जण तर निवडणुकीनंतर आपण सांगितलेलं कसं खरं ठरलं हे सांगताना पूर्वी आपण काय बोललो हे सोयीस्करपणे विसरून जातात आणि आपल्या सांगण्याचा फायदा त्या विजयी उमेदवाराला कसा झाला याची कहाणी अगदी तिखट, मीठ लावून सांगत असतात. त्यामुळे येणारे दिवस अशा बडबोल्या नेत्यांचे असणार आहेत. त्यामुळे जागल्या मतदारांना अशा अचानक उगवलेल्या नेत्यांपासून सावध रहावे लागणार आहे. अर्थात काहींना त्यांच्याकडून मनोरंजनही होईल आणि त्यांचा दिवसही मजेत जाईल, हेही नसे थोडके.