आप्पासाहेब पाटील
सोलापूर : ढाब्यावर केवळ जेवण करता येते, त्यामुळे ढाब्यावर दारू पिणे कायदेशीर गुन्हा आहे. दरम्यान, ढाबा चालकांना दारू विक्री करण्याची परवानगी नसते. परिणामी अवैध दारू विक्री झाली तर ढाबा चालकासह पिणाऱ्याविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येते. मागील दहा महिन्यात १३० ढाब्यावर एक्साईजने कारवाई करून दंड ठोठावला आहे.
दरम्यान, दारू विक्री करणे किंवा दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे यासाठीचे स्वतंत्र परवाने घ्यावे लागतात. त्या परवान्याच्या अधीन राहूनच दारू विक्री करता येणार आहे; मात्र अलीकडे बाहेरून दारू आणून ढाब्यावर पिण्याचे प्रकार सर्रास वाढले आहेत. काही ढाबा विक्रेतेही दारू उपलब्ध करून देत असल्याचे अनेक छाप्यात आढळून आले आहे. त्यामुळे आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यासोलापूर टीमने ढाब्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
------------
दहा महिन्यातील कारवाईवर एक नजर...
- - एकूण धाबे / हॉटेलवर नोंदविलेल्या गुन्ह्यांची संख्या - १३२- अटक आरोपींची संख्या - १३६
- - जप्त मुद्देमालाची किंमत - ४ लाख ३० हजार
- - दंडाची रक्कम - १ लाख ११ हजार ५००
----------
इतर ठिकाणीही एक्साईजचे छापे
राज्य उत्पादन शुल्कच्या सोलापूर विभागाने ढाबे, हॉटेल व्यतिरिक्त इतर ठिकाणी देशी/ विदेशी दारू विक्री/ वाहतुकीचे ३८५ गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणात ३९१ आरोपींना अटक करण्यात आली असून या एकूण कारवाईत ७६ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
-----------
हायवेवरील ढाब्यावर कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या ढाब्यावर सर्रासपणे कारवाई करण्यात येते. पुणे हायवे, तुळजापूर हायवे, मंगळवेढा हायवे, हैद्राबाद रोड, अक्कलकोट रोड यासह अन्य तालुक्याच्या हद्दीत असलेल्या ढाब्यात दुय्यम निरीक्षकांकडून कारवाई करण्यात येते.
--------
ढाब्यावर दारू पिणे तसेच दारू पिण्याकरिता जागेची व्यवस्था करून देणे हे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा आहे. कोणत्याही ढाबा, हॉटेलवर किंवा अवैध ठिकाणी दारू पिताना आढळून आल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- नितीन धार्मिक, पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर