सोलापूर : प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी आणि मतमोजणीची आकडेवारी यात तफावत असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे २०१९ चे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. यावर सुनावणी पूर्ण झाली असून मंगळवारी, २ एप्रिल रोजी कोर्टाने या प्रकरणी निकाल दिला आहे. आंबेडकरांची तक्रार न्यायालयाने फेटाळल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली आहे.
सोलापूर लोकसभा मतदार संघातून २०१९ साली प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवली होती. मतदान आणि मतमोजणी यात २४२ मतांची तफावत आहे. तसेच ईव्हीएम मध्ये मतांची तफावत जाणवत असल्याची तक्रार करत त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी न्यायालयात धाव घेतली होती. मतदान दिनी सायंकाळी निवडणूक आयोगाला मतदानाची प्राथमिक आकडेवारी दिली जाते. दुसऱ्या दिवशी अंतिम आकडेवारी पाठवली जाते. प्राथमिक आकडेवारीत आणि मतमोजणीतील आकडेवारी काही मतांचा फरक जाणवला. परंतू, मतदान दिनाची अंतिम आकडेवारी अन् मतमोजणीची आकडेवारी यात फरक नव्हता. ही माहिती आम्ही कोर्टात सादर केली. कोर्टाने आंबेडकरांची तक्रार फेटाळून लावली आहे, असे गणेश निऱ्हाळी यांनी सांगितले.