राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे, सिद्धेश्वर आवताडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, शहाजहान शेख, राहुल घुले, रणजित बागल, अमर इंगळे, संतोष बंडगर, अनंता नाईकनवरे, संतोष मोरे उपस्थित होते.
सचिन पाटील म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची २ मे रोजी मतमोजणी पार पडली. निवडणुकीत झालेले मतदान व माेजलेले मतदान यात सुमारे १३०० मतांची तफावत आहे. प्रमुख दोन उमेदवार वगळता इतर उमेदवारांना मिळालेले मतदान आणि मतदारसंघातील लोकांकडून केलेले मतदान यात मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. ज्या गावातून आम्हाला हजारो मते पोल झाली आहेत. अशा ठिकाणी ४ व २ मते दाखवली जात आहेत. सर्वसामान्य जनतेला व आम्हाला ईव्हीएम मशीनशी छेडछाड झाल्याची शक्यता व्यक्त होत असून, ही मतमोजणी मान्य नाही. त्यामुळे फेरमतमोजणी घेऊन यावेळी मतदान केल्यानंतर डब्लूपीएटी मशीनमध्ये पडणाऱ्या चिठ्ठ्याही मोजण्यात याव्यात, अशी मागणी स्वाभिमानीने केली आहे.
सीलबंद गोडाऊनसमोर ती वस्तू पडली कशी ?
पंढरपूर येथील शासकीय गोदामांमध्ये ईव्हीएम मशीन असलेली स्ट्राँगरूम पूर्णपणे सीलबंद होती. गोडाऊन क्रमांक ४/सीच्या पुढील उजव्या बाजूच्या कट्ट्यावर यूयूपीएटीचा बॅटरी व फाटलेले पांढरे पाकीट पडलेले होते. त्या पाकिटावर ‘१५२/५८’ असा उल्लेख होता. सर्व गोडाऊन सीलबंद होते तर ही वस्तू त्या ठिकाणी पडली कशी ? कोणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केला आहे का? त्या दिवशीच्या तेथे कर्तव्य बजावत असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई कशी केली नाही, असा सवालदेखील सचिन पाटील यांनी उभा केला आहे.
----
लाखांची वर्गणी गोळा, बहिणीच्या घरात जादा मते तरी मतदान कमी
निवडणूक लढवण्यासाठी मला ३२ लाख ६८ हजार रुपये वर्गणी गोळा झाली. तिथे इतकी कमी मतं मिळाली हे मनाला न पटणारी गोष्ट आहे. त्याचबरोबर पंढरपूर शहरात संभाजी चौकात माझी बहीण, मामी, अनेक नातेवाईक आहेत. बहिणीच्या घरातीलच १५ ते २० मते आहेत. तरीही त्या ठिकाणचे नागपूरकर महाराज मठ बूथवर ५ मते पडली आहेत. या सर्व गोष्टी मला चुकीच्या वाटत असल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले.