सोलापूर : सोशल मीडियाचा वापर जसा वेळ घालविण्यासाठी केला जातो, तसा तो चांगल्या कामासाठीदेखील होऊ शकतो. सोलापुरकरांनी प्रत्यक्षात हे दाखवून दिले. सात रस्ता परिसरात आईविना असलेल्या अनाथ श्वानाच्या पिल्लांचा फोटो पाहिल्यावर सोलापुरकरांना वाईट वाटले. पाहता-पाहता अनेकांनी सर्व अकरा पिल्ले दत्तक घेतली.
सात रस्ता व्हीआयपी रोडवर कुणीतरी पोत्यामध्ये १२ श्वानांच्या पिल्लांना सोडून गेले. पाऊस पडत असल्याने पिल्ले भिजत होती. भिजून थंडी लागत असल्याने यातील एका पिल्लाचा मृत्यू झाला. महेंद्र कांबळे या तरुणाने अंकुर येळीकर याला याची माहिती दिली. अंकुरने सोशल मीडियावर श्वानाच्या पिल्लाचा फोटो व पत्ता शेअर केला. अंकुरच्या अनेक मित्रांनी ती पोस्ट शेअर केली.
जुळे सोलापूर येथे राहत असलेल्या अभिजीत गायकवाड याने सर्व पिल्लांना सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली. रात्रीच सात रस्ता येथून पिल्ले घेऊन त्यांना टॉवेलने सुकविण्यात आले. साधारणपणे दोन दिवसांपासून दूध न मिळाल्याने पिल्लांना भूक लागली होती. नवजात बाळांना दूध पाजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दुधाच्या बाटलीने पिल्लांना दूध पाजण्यात आले. काही वेळातच पूर्वा कुलकर्णी या तरुणीने एका पिल्लाला दत्तक घेणार असल्याचे सांगितले. जुळे सोलापुरात येऊन तिने एका पिल्लाला घेतले. अंकुर व अभिजीत यांनी पिल्लांना सांभाळण्यासंबंधी काही सूचना केल्या.
-------
शहरात हवे शेल्टर
अनेक शहरांमध्ये भटक्या श्वानांसाठी शेल्टर आहे. तिथे अशा अनाथ पिल्लांची काळजी घेतली जाते. प्रसंगी उपचारही केले जातात. पिल्ले मोठी होईपर्यंत त्यांची काळजी घेतली जाते. यामुळे अशी पिल्ले आढळल्यास त्यांची राहण्याची सोय होते. या पद्धतीने शेल्टर शहरात असावे, अशी अपेक्षा प्राणीप्रेमींनी व्यक्त केली.
-------
निर्बिजीकरण करणे गरजेचे
शहरात अनेक ठिकाणी श्वानांची संख्या वाढली आहे. श्वानांनी नागरिकांचा चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. श्वानांनी पिल्लांना जन्म दिल्याने आणखी श्वानांची संख्या वाढत आहे. शहरात अनेक ठिकाणी श्वानांची पिल्ले दिसत असून वाहनाखाली येऊन त्यांचा अपघात होत आहे. वेळीच निर्बिजीकरण झाल्यास श्वानांची वाढती संख्या नियंत्रित होईल. सध्याची परिस्थिती पाहता श्वानांच्या निर्बिजीकरणाची संख्या तुलनेने कमी असल्याचे, प्राणीप्रेमींनी सांगितले.