सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार दिलीप माने यांच्या गटाने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटातील बहुतांश उमेदवारांना पराभूत करून बाजार समितीवर सत्ता स्थापन करण्यात यश मिळविल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़
सुरूवातीच्या कलानुसार हिरज गणातून माजी आमदार दिलीप माने, कुंभारी गणातून पालकमंत्री विजयकुमार देशमुख, हमाल तोलार मतदारसंघातून शिवानंद पुजारी हे विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे़ एकूणच सर्वच निकाल हाती येण्यास दुपारपर्यंतचे किमान तीन ते चार वाजतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे़
सोलापूर बाजार समिती निवडणुकीसाठी सकाळी ८ वाजल्यापासून सोलापूर-विजापूर रोडवरील सोरेगांव येथील पोलीस कॅम्पच्या सभागृहात मतमोजणीस प्रारंभ झाला़ उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज गणातून भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे बंधू इंद्रजित पवार हे पराभूत झाल्याची माहिती समोर आली आहे तर कुंभारी गणातून पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे विजयी झाले आहेत़ मुस्ती गणातून नरोळे हे विजयी झाले आहेत तर माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे पराभूत झाल्याचे सांगण्यात आले़ पाकणी गटातून प्रकाश वानकर हे विजयी झाले आहेत़
सुरूवातीच्या कलांमध्ये माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखालील कॉग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या महाआघाडीने सुरूवातीलच्या कलात वर्चस्व प्रस्थापित केले होते़ सर्वपक्षीय पॅनलने आघाडी घेतली आहे तर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पॅनल पराभवाच्या छायेत आहे. सर्वपक्षीय पॅनलचे उमेदवार २०० ते ५०० मतांनी आघाडीवर आहेत.