काँग्रेस पक्षातून शिवसेनेत गेलेल्या दिलीप मानेंना खुद्द अजितदादांनीच दिले दूध संघाचे अध्यक्षपद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 11:41 AM2020-09-03T11:41:27+5:302020-09-03T11:53:27+5:30

परिचारक गट पूर्णपणे तटस्थ : रागीट स्वभावाचा मुद्दा पडला बाजूला; बॅँकेच्या केबिनमध्ये राजे-भोसलेंसोबत दिलजमाई

Dilip Mane, who joined Shiv Sena from Congress party, was given the chairmanship of Dudh Sangh by Ajit Pawar himself! | काँग्रेस पक्षातून शिवसेनेत गेलेल्या दिलीप मानेंना खुद्द अजितदादांनीच दिले दूध संघाचे अध्यक्षपद !

काँग्रेस पक्षातून शिवसेनेत गेलेल्या दिलीप मानेंना खुद्द अजितदादांनीच दिले दूध संघाचे अध्यक्षपद !

Next
ठळक मुद्देअडचणीतील संघ सावरण्यासाठी आपणाला अजित पवार यांची मदत घ्यावी लागेल, अशी भूमिका नेत्यांनी मांडलीजिल्ह्यात अजित पवारांचे पर्यायाने राष्ट्रवादीचेच सध्या चालतेय, हे दाखविण्याची संधी निवडीच्या निमित्ताने पवारनिष्ठांना मिळाली बदलत्या राजकीय प्रवाहात आमदार प्रशांत परिचारक यांना सामील करून घेण्याचा झालेला प्रयत्न अयशस्वी

सोलापूर : अपेक्षेप्रमाणे सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदी माजी आमदार दिलीप माने यांची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या मानेंना राष्टÑवादीच्या अजित पवारांनीच अध्यक्षपद बहाल केले.  जिल्हा दूध संघाच्या कार्यालयात विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दूध) सुनील शिरापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. 

आमदार प्रशांत परिचारक यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी बुधवारी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. चेअरमन निवडीची  चर्चा करण्यासाठी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, दिलीप सोपल, दीपक साळुंखे, राजन पाटील, आमदार संजय शिंदे, दूध संघाचे व्हाईस चेअरमन मनोहर डोंगरे, बबनराव आवताडे यांची बैठक  झाली. 

बैठकी अगोदरच आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार दिलीपराव माने यांची नावे चेअरमनपदासाठी असल्याचे ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले; मात्र साखर कारखाना, आमदारकीमुळे मुंबई, करमाळा व माढा तालुक्यातील जनतेसाठी वेळ द्यावा लागत असल्याने मला ते जमणार नाही, असे आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले. तसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही सांगितले. संचालक व ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत संघ सावरण्यासाठी माने यांच्या नावावर एकमत झाल्याचे दीपक साळुंखे यांनी अजितदादांना सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माने यांना चेअरमन करण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर दुपारी अडीच वाजता संघाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत एकमताने माने यांची निवड करण्यात आली. माने यांना सूचक व अनुमोदक म्हणून बबनराव आवताडे व विजय यलपल्ले यांच्या सह्या आहेत. 

मोहिते-पाटलांची जवळीक राजे-भोसलेंना नडली.. 

  • - बदलत्या राजकीय प्रवाहात आमदार प्रशांत परिचारक यांना सामील करून घेण्याचा झालेला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर राजकीय घडामोडी घडल्या. माजी आमदार दिलीप माने यांच्या गळ्यात दूध संघ चेअरमनपदाची माळ पडली. मोहिते-पाटील यांच्याशी असलेल्या जवळिकीचा तोटा राजेंद्रसिंह राजे-भोसले यांना बसणार असल्याचे अगोदरच स्पष्ट झाले होते.
  • - सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचे नाव अंतिम करण्याचे अधिकार अगोदरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले होते. जिल्ह्यात अजित पवारांचे पर्यायाने राष्ट्रवादीचेच सध्या चालतेय, हे दाखविण्याची संधी निवडीच्या निमित्ताने पवारनिष्ठांना मिळाली होती. दूध संघ मोठ्या आर्थिक अडचणीत आहे व संघ सावरण्यासाठी शासनाची मदत आवश्यक असल्याचे कारण जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या तोंडी आहे. त्यामुळेच दूध संघाच्या चेअरमन निवडीची सूत्रे अजित पवारांच्या हातात गेली.
  • - अडचणीतील संघ सावरण्यासाठी आपणाला अजित पवार यांची मदत घ्यावी लागेल, अशी भूमिका नेत्यांनी मांडली. यामुळे काही नेत्यांकडून बदलत्या राजकीय प्रवाहात आमदार प्रशांत परिचारक यांना सामील करून घेण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र परिचारक संपर्कात आले नाहीत. ३५ वर्षे संचालक असल्याचे सांगत चेअरमनपदासाठी इच्छुक असलेल्या राजेंद्रसिंह राजे-भोसले यांना मोहिते- पाटील यांच्याशी असलेली जवळिकी अडचणीची ठरली. यामुळे दिलीप माने यांच्या चेअरमन निवडीचा मार्ग सोपा झाला. 

चुकीच्या गोष्टींना पायबंद घालणार : माने
चेअरमन निवडीनंतर बोलताना मला १५ दिवसांचा वेळ द्या, तुम्हाला फरक दिसेल असे दिलीप माने म्हणाले. सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे नाव राज्यात घेतले जाईल, असे काम दिसेल असे माने म्हणाले. निवडीनंतर माने  यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार गणपतराव देशमुख, दिलीप सोपल, संचालक राजेंद्रसिंह राजे-भोसले यांनी दूध संघाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी दिलीप माने यांच्यावर जबाबदारी दिल्याचे सांगितले. दूध संघ सावरण्यासाठी आठ दिवसात आराखडा तयार करण्यात येईल, संघात सध्या काही चुकीचे होतेय, त्याला पायबंद घातला जाईल, असे माने म्हणाले. 

Web Title: Dilip Mane, who joined Shiv Sena from Congress party, was given the chairmanship of Dudh Sangh by Ajit Pawar himself!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.