दक्षिण सोलापूर : निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वळसंग पोलीस ठाण्याला चार चारचाकी वाहने तर जिल्हा पोलीस प्रमुखांनी दोन दुचाकी वाहने दिली आहेत. येत्या आठ दिवसात पेट्रोलिंग वाढवणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करणे शक्य होणार असल्याची माहिती वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली.
शनिवारी दिवसभरात निर्बंधाची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाया करण्याचे सत्र सुरूच राहिले. विनामास्क वावरत असलेल्या २२, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या आठ जणांवर आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या तिघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याने तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मुदतीनंतर व्यवसाय करणाऱ्या होटगी येथील हॉटेल आणि किराणा दुकान सील करण्यात आले.
-----
पेट्रोलिंगमध्ये वाढ
जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्वी सातपुते यांनी वळसंग पोलीस ठाण्यासाठी दोन दुचाकी वाहने पुरवली आहेत. जिल्हा महसूल प्रशासनाने अधिग्रहित करण्यात आलेली चार चारचाकी वाहने दिली आहेत. आता दिवसभर पोलीस त्यांच्या हद्दीत चोख बंदोबस्त ठेवणार आहेत. विनामास्क वावरणारे, विनाकारण रस्त्यावरून फिरणारे आणि सामाजिक अंतर न पाहणारे नागरिक यांच्यावर थेट कारवाई करण्याची व्यवस्था पोलिसाकडून होणार आहे.