सोलापूर : भिडे आसमंती धध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली.. एकूणच पंढरपुरातील वातावरण अधिकच भक्तीमय होत चालले आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्यापूर्वीच राज्याच्या कानाकोपऱ्यातील असंख्या दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. पंढरपुरात दाखल झालेल्या भाविकांनी चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळत आहे. दरम्यान, चंद्रभागेच्या तीरावर भक्तीचा मेळा जमल्याचे चित्र दिसून येत आहे.
१३ जुलै रोजी आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. या आषाढी वारीला राज्यासह परराज्यांतून मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत. यामध्ये विशेषतः तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच विदर्भ, कोकण, मराठवाड्यातील भाविकांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे. आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरात दाखल होऊन आळंदी, देहू या ठिकाणाहून आलेल्या दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी हे भाविक पुढे वाखरी, पिराची कुरोली, भंडीशेगांव, तोंडले-भोंडले आदी ठिकाणी गर्दी करतात. याशिवाय परराज्यातून आलेले भाविक उभे रिंगण, गाेल रिंगण अन् धावा पाहण्यासाठीही धडपड करतात.
आषाढी यात्रा सोहळ्यासाठी येत असलेल्या दोन्ही मुख्य पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले आहे. आज शनिवार १३ जुलै रोजी माऊलींचे खुडूस येथे गोल रिंगण होणार आहे तर तुकोबांचे माळीनगर येथे उभे रिंगण होणार आहे. दोन्ही पालख्या मुक्कामानंतर पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. पालख्यासोबत हजारो भाविक पंढरपूरकडे येत आहेत. एकूण पंढरपूर, माळशिरस तालुक्यात सर्वत्र भक्तीमय वातावरण दिसून येत आहे.