यशवंत सादूल
पंढरपूर : विठ्ठलाच्या भक्तिरसासोबत अधूनमधून पडणाºया पावसात चिंब भिजत सायकलवरून प्रवास करणारे वारकरी. सातशे ते साडेसातशे किलोमीटरचा रस्ता पार करीत दर आषाढीला पंढरी गाठतात. पन्नाशी आणि त्यापुढील वयाचे हे सर्व विठ्ठलभक्त असून, ते खान्देशातील जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील ओंकारेश्वर या छोट्याशा खेड्यातील आहेत. यंदा त्यांचे एकविसावे वर्ष आहे. पंढरीच्या वाटेवर असलेल्या या सायकल दिंडीची भेट मोहोळ ते पंढरपूर मार्गावरील सारोळे गावानजीक झाली.
सायकलला बांधलेल्या छोट्याशा लाऊडस्पीकरवरून माझे माहेर पंढरी... सावळ्या विठ्ठला़़़ यासारखी भाव आणि भक्तिगीते वाजवित रांगेने येणारे अनोखे वारकरी. जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील ओंकारेश्वर ते पंढरपूर जवळपास साडेसातशे किलोमीटर अंतर पार करीत दरवर्षी आषाढीला पंढरीला येणारे हे वारकरी. मागील एकवीस वर्षांपासून त्यांची ही सायकल दिंडी अखंडपणे चालू आहे. या दिंडीतील सर्व वारकरी हे पन्नास व त्यापुढील वयोगटाचे असून, त्यांचा उत्साह मात्र तरुणांसारखा आहे. त्यातील बहुतेक जण शेतकरी, शेतमजूर आहेत तर काही भेळ, चणेफुटाणे विके्रते आहेत. पासष्ट वर्षांचे दशरथ महाराज भोईराज हे दिंडीचे प्रमुख असून, सर्वात पुढे सायकलवर होते. त्यांच्यासोबत संजय महाजन, आबेद भोई, कैलास भोई, गोविंद भोई, सुनील महाजन, काळू भैरी, अनिल जंजाळकर, प्रभाकर पाटील, गोकुळ राजपूत हे सदस्य होते.
ओंकारेश्वर येथून २६ जून रोजी ही सायकल दिंडी निघाली. पुढे रावेर ते जामनेर, भोकरदन, कपिलधार, बीड, उस्मानाबाद, तुळजापूर, सुरतगाव फाटा, मोहोळमार्गे सातशे पन्नास किलोमीटरचा सायकल प्रवास अकरा दिवसांमध्ये पूर्ण करून पंढरीत पोहचत आहे. यामध्ये नऊ ठिकाणी मुक्काम केला आहे. दररोज सरासरी ७५ ते ८० किलोमीटर अंतर कापले जाते. पहाटे सहा वाजता निघाले की ४० किलोमीटर अंतरावरील गावात जेवण व विश्रांतीसाठी थांबले जाते. सायंकाळच्या सत्रात पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतर कापले जाते. रात्रीचा मुक्काम त्या गावातील मंदिरात केले जाते. सायकलचालक हे पंक्चर व इतर रिपेअरी स्वत: करतात़ सर्व साहित्य सोबतच असते. पंढरपूरला सद्गुरू दिगंबर मठात त्यांचा मुक्काम असतो. एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर माघारी फिरतात. त्यांचा परतीच्या प्रवासाचा मार्ग मात्र दुसराच आहे. पंढरपूरहून टेंभुर्गी, करमाळा मार्गे नगरला जातात. शनिशिंगणापूर, शिर्डीचे दर्शन घेऊन कोपरगाव, चाळीसगावमार्गे जळगाव आणि ओंकारेश्वरला जातात.
पाऊस आला तरी थांबणे नाही...- एका मुक्कामाच्या ठिकाणाहून सायकलवर स्वार झाल्यावर कितीही जोराचा पाऊस आला तरी दिंडीतील एकही जण थांबत नाही. पावसात चिंब भिजत विठुनामाचा जयघोष करीत आलेल्या पावसाचे स्वागत करीत दिंडी पुढेच सरकते. मुक्कामाच्या ठिकाणीच थांबते. यावेळी अंगात वेगळीच ऊर्जा संचारते असा त्यांचा अनुभव आहे. यंदाच्या प्रवासात चार मोठे तर पाच ते सहा हलक्या पावसाच्या सरी अंगावर झेलत आतापर्यंत प्रवास केल्याचे सहभागी दिंडीकºयांनी यांनी सांगितले.
१९९२ साली अवघ्या दोघांनी सुरू केलेली ही वारी आज अकरा जणांची आहे. सर्वजण पन्नाशीच्या पुढचे आहेत.गावकरी आर्थिक मदत करतात.इच्छुकांची संख्या वाढली असली तरी आम्ही मर्यादा ठरविली आहे. दरवर्षीची ही आमची आनंद वारी असून, अमर्याद आनंद मिळतो. -दशरथ महाराज भोईराज, सायकल दिंडीप्रमुख, रावेर