सोलापूर : सिध्दरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्यानिमित्त शनिवारी कुंभार कन्येच्या माहेरांकडून ५६ मातीच्या घागरी यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी कुंभार समाजातील महिलांसह भाविक मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते. १२ व्या शतकात कुंभार वाड्यातील कुंभार कन्येचा कसब्यातील सिध्दरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाशी प्रतिकात्मक विवाह झाला होता. आजही परंपरेनुसार संमत्ती भोगीच्या दिवशी विवाह सोहळा पार पाडला जातो.
प्रारंभी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कुंभार वाडा येथे प्रमुख मानकरी मल्लिकार्जुन कुंभार यांनी वाड्यातील गणपती व सिध्दरामेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर वाड्यात दीप बसवण्यात आले. त्यानंतर हलगीच्या कडकडाटात व सनईच्या मंजूळ स्वरात ५६ मातीच्या घागरी मिरवणुकीने कुंभार वाड्यातून हिरेहब्बू वाड्यात आणण्यात आले. योगीराज शिवलिंग म्हेत्रे यांच्याकडून मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्याकडे मातीच्या घागरी सुपुर्द करण्यात आले.
त्यानंतर सिध्दामेश्वर महाराज पूजास्थान येथील शिवलिंगाचे पूजन करून नवैद्य दाखविण्यात आले. त्यानंतर प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी उपस्थित वधू पक्षातील कुंभार समाजाला सिध्दरामेश्वरांनी सुरू केलेली अक्षता सोहळ्याच्या प्रथेची माहिती सांगून ती आजतागायत परंपरेनुसार सुरू असून ती पुढेही संस्काररुपाने पुढे नेण्याचे आवाहन केले. यावेळी भिमाशंकर म्हेत्रे, योगीराज म्हेत्रे, रेवणसिध्द म्हेत्रे - कुंभार, संगण्णा म्हेत्रे - कुंभार, नागनाथ म्हेत्रे - कुंभार, सुरेश म्हेत्रे- कुंभार, महादेव कुंभार यांच्यासह समाजील सुवासिनी महिला सहभागी झाल्या होत्या.