सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिना नदी व कुरूल कॅनॉलमध्ये पाणी नसल्याकारणाने उद्भवलेल्या पाणी प्रश्नावर आमदार सुभाष देशमुखसह स्थानिक शेतकऱ्यांनी सिंचन भवन समोर ठिय्या आंदोलन केले. सुभाष देशमुखांनी फोन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना थोडा धीर धरा, आम्ही लक्ष घातलं आहे. दोन दिवसात पाण्याचा प्रश्न सुटेल असे अश्वासन दिले.
पाणी प्रश्नावर भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांसमवेत शनिवारी दुपारी अचानक गुरूनानक चौक येथील सिंचन भवना समोर ठिय्या आंदोलन केले. कॅनलला पाणी नसल्यामुळे परिसरातील शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. उन्हाळा असल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उदभवलेला आहे. सध्या तीव्र उन्हाळा असताना देखील पाटबंधारे विभागामार्फत सिना नदी व कुरूल कॅनॉलमध्ये टेल एंडपर्यंत पाणी सोडलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह आमदार सुभाष देशमुख यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे व उपविभागीय अधिकारी शिरीष जाधव यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकऱ्यांनी ऐकले नाही.
अखेर आमदार सुभाष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. स्पिकर ऑन ठेवून त्यांनी आंदोलनाची परस्थिती सांगितली. शेतकरी सगळे थांबले आहेत, अधिकाऱ्याशी बोलणे झाले आहे. तुम्हीही बोलण गरजेचे आहे असे म्हणाले, स्पिकर ऑन असलेल्या मोबाईलवर बोलताना फडणवीस म्हणाले की, सुभाष बापूंनी मला सगळी माहिती दिली आहे. माझ बोलण झाला आहे, पाणी आजपासून चालू करतोय २ ते ३ दिवसात सर्व व्यवस्थीत होईल. थोडा धिर धरा आता आम्ही लक्ष घातलं आहे, यातून नक्की मार्ग काढू असे अश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी फडणवीस व देशमुख यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. यावेळी संदीप टेळे, रामचंद्र बिराजदार, पंडित बुळगुंडे, राजुरचे सरपंच लक्ष्मण गडदे, औरादचे सरपंच शांतकुमार गडदे, आप्पासाहेब पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.