लोकमत न्यूज नेटवर्क
नासीर कबीर
करमाळा :शेटफळ (ता.करमाळा) येथील शेतकऱ्यांचा पेरू दिल्लीच्या बाजारपेठेत चांगलाच भाव खात आहे. गटशेती माध्यमातून घेतलेल्या फळाचे किसान रेल्वे सुविधेमुळे दिल्ली बाजारपेठेत बोलबाला वाढला आहे. थेट व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्यामुळे शेतकऱ्यांना भावही चांगला मिळू लागला आहे.
करमाळा तालुक्यात शेटफळ येथील तरुण शेतकरी पाच वर्षांपासून केळी व पेरुचे फळ पीक घेत आहे. निर्यातक्षम केळी बरोबरच प्रायोगिक तत्त्वावर प्रगतिशील शेतकरी विजय लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. एन. आर. जातींच्या पेरूची लागवड केली आहे.
गट शेतीच्या माध्यमातून येथील विजय लबडे, नानासाहेब साळुंके, महावीर निंबाळकर यांनी शेतात सुरुवातीला व्ही. एन. आर. पेरुची लागवड केली.
पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातील उत्कृष्ट पेरु शेती करणाऱ्यांना त्यांच्या शेतीला भेटी देऊन या पिकातील बारकावे समजून घेतले.
एकरी १५ टनांपर्यंत उत्पादन घेतले. परंतू पुणे, मुंबई, हैदराबाद या बाजारपेठेत चांगला दर मिळत नव्हता. किसानरेल्वे सुविधेमुळे दिल्ली बाजारपेठेत २५ तासांच्या कालावधीत माल पोहोचू लागला. मालाचा दर्जा चांगला असल्याने दरही चांगला मिळू लागला. पेरुचे उत्तम प्रकारे ग्रेडिंग पॅकिंग व दहा किलो वजनाच्या बॉक्स मध्ये शेतकरी दिल्ली बाजारपेठेत माल पाठवला जात आहे. दिल्लीच्या व्यापाऱ्यांकडून मागणी होत आहे. रेल्वे विभागाकडून किसान रेल्वे सुविधा सुरू झाल्यामुळे वाहतूक खर्चात मोठी बचत झाली आहे.
----
गटशेतीच्या माध्यमातून पेरु पीक निवडले. भरघोस उत्पादन घेण्यात यशस्वी झालो. परंतू सुरुवातीला बाजारपेठेची अडचण होती. किसान रेल्वे सुविधेमुळे ती दूर झाली आहे. शेटफळ परिसरातील शेतकऱ्यांचा माल जेऊर येथून पाठविला जात होता. परंतु रेल्वेने जेऊर येथील लोडिंग बंद केल्यामुळे कुर्डुवाडी येथे माल घेऊन जावा लागत आहे. जेऊर येथील सुविधा पूर्ववत सुरू करणे गरजेचे आहे.
- विजय लबडे
पेरू उत्पादक,
शेटफळ, ता.करमाळा
---
थेट दिल्ली बाजारपेठ
कृषिरत्न आनंद कोठडिया यांच्या मार्गदर्शनाखाली कंदर येथील किरण डोके यांच्या सहकार्याने दिल्ली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी थेट संपर्क झाला. माल थेट पाठविणे शक्य झाले. यामुळे स्थानिक बाजारपेठेपेक्षा दुप्पट दर मिळाला आहे. सध्या काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ३० एकर क्षेत्रावर हे फळपीक घेतले आहे. किसान रेल्वे सुविधेमुळे थेट दिल्ली बाजारपेठेत मार्केटिंग होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.
----
फोटो : २३ करमाळा