करमाळा : अपंग व्यक्ती शासनाच्या उदासीन धोरणामुळे दुर्लक्षित असून, अपंग हक्क संरक्षण कायद्याची राज्य शासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी अन्यथा अपंगांचे राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल, असा आ. बच्चू कडू यांनी सांगितले़प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्यावतीने आज करमाळ्यातील विकी मंगल कार्यालयात सोलापूर जिल्हास्तरीय अपंग व्यक्तींचा मेळावा संस्थापक अध्यक्ष आ.बच्चू कडू यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र सातव, राज्य समन्वयक अभय पवार, मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल, माजी नगराध्यक्षा पुष्पाताई फंड, पुणे जिल्हाध्यक्षा रेखा ढवळे, नाशिक जिल्हाध्यक्षा संध्या जाधव, संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर म्हेत्रे, सोलापूर जिल्हाध्यक्ष पिंटू भोसले, महिला जिल्हाध्यक्षा अॅड. सुनीता देवी, तालुका महिला अध्यक्षा मीना राखुंडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अॅड. बाबुराव हिरडे, पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बबन आरणे यांनी केले. यावेळी बोलताना आ.बच्चू कडू म्हणाले, अपंगांना समाजात सन्मानाने जगण्यासाठी शासकीय नोकऱ्यातील अनुशेष भरणे गरजेचे आहे. अपंगांना उदरनिर्वाह भत्ता ४ हजार रुपये दिला पाहिजे. अपंगांना व्यवसायासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका यांनी विना डिपॉझिट दुकान गाळे दिले पाहिजेत. अपंगांना घरकूल योजनेत समाविष्ट करत असताना दारिद्र्यरेषेची अट नसावी अशी मागणी त्यांनी भाषणातून केली.प्रारंभी आ. बच्चू कडू यांनी शहरातील फंड गल्ली येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या करमाळा शाखा कार्यालय व नामफलकाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंनिसचे कार्यवाह व्ही.आर गायकवाड यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे तालुकाध्यक्ष बबन आरणे, शहराध्यक्ष समीर बागवान, प्रदीप देवी, अशोक पठाण, भरमशेट्टी यांनी परिश्रम घेतले. मेळाव्यास जिल्हाभरातून शेकडो अपंग उपस्थित होते.
अपंग हक्क कायद्याची अंमलबजावणी हवी
By admin | Published: June 22, 2014 12:42 AM