गेल्या तीन वर्षांपासून तालुकाध्यक्ष म्हणून काम करत असलेले ॲड. दीपक पवार हे कल्याणराव काळे यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यांनी तालुक्यात राष्ट्रवादीची एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध केली. शिवाय, भाळवणी झेडपी गटात राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य निवडून आणले आहेत. सध्या काळे भाजपामध्ये असले तरी राष्ट्रवादीत येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ते विठ्ठल परिवाराचे नेते आहेत. म्हणून, त्यांना मंगळवेढा संवादयात्रेच्या पत्रिकेत नाव टाकून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळीही दीपक पवार यांनी विरोध दर्शविला होता. शिवाय, येणाऱ्या काळात होत असलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना, विठ्ठल कारखाना, विधानसभा पोटनिवडणूक यावरून विठ्ठल परिवार व तालुका राष्ट्रवादीमध्ये दोन गट सक्रिय असून निवडणुकीत विरोध करतील, असे गृहीत धरून एकमेकांचा काटा काढत प्रमुख पदावर आपापल्या कार्यकर्त्यांना बसविण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत.
पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेलच्या निवडी मागील १५ दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या उपस्थित झाल्या होत्या. यावेळी शरद पवारांच्या भूमिकेला छेद देत सर्व जाती-धर्माच्या पदाधिकाऱ्यांना सामावून न घेता एकाच जातीचे व आपल्या जवळच्या ९० टक्के लोकांना पदे दिल्याचा आरोप करत अनेक अल्पसंख्याक कार्यकर्ते नाराज होते.
शनिवारी पक्षाचे निरीक्षक, जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीतील नेतेमंडळी पोटनिवडणुकीसंदर्भात पंढरपुरात कार्यकर्त्यांशी संवाद साधून गेले. यावेळी या पदाधिकाऱ्यांसमोर अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये विसंवाद असल्याने गोंधळाचे वातावरण होते आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी तडकाफडकी पदाधिकाऱ्यांमध्ये बदल झाल्याने खळबळ उडाली आहे. पक्षाने घेतलेल्या या भूमिकेमुळे अनेक नाराज पदाधिकारी, कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येणारी पोटनिवडणूक व इतर निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा होणार आहे.
कोट ::::::::::::::::::::
विधानसभा निवडणूक कार्यकर्ता बैठकीवेळी असा कोणताही विषय झाला नव्हता. मात्र, पक्षातील काही विघ्नसंतोषी लोकांनी पक्षनिरीक्षक, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची दिशाभूल केली आहे. याबाबत आपले वरिष्ठांची बोलणं झालं आहे. सोमवारी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. सर्वांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ.
- ॲड. दीपक पवार
माजी तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कँग्रेस, पंढरपूर