सोलापूर : उजनी धरणात सध्या १०८ टक्के पाणी पातळी तयार होऊन १२१ टीएमसी पाणीसाठा तयार झालेला आहे व विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे दौंड येथून भीमा नदीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग सतत वाढत असल्यामुळे रात्री आठ वाजता ८८०० क्युसेक्स पर्यंत दौंड येथील विसर्ग गेलेला आहे. उजनीतून भीमा नदीत १० हजार क्यूसेक पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.
नियोजित १११.१२ % टक्के पाणीपातळी उजनी धरणात कायम ठेवण्यासाठी फक्त ३ टक्के पाणीसाठा आवश्यक असून आगामी एक ते दोन दिवसात तो पूर्ण होण्याच्या मार्गावर निश्चित आहे. या सर्व सद्यपरिस्थिती मुळे धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रात्री ९ वा. पासून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात १०००० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास प्रारंभ झालेला आहे.
दौंड येथून धरणात कमी-जास्त येणाऱ्या पाण्याच्या विसर्गचा विचार करून सध्याच्या ५००० क्युसेक्स विसर्गात मध्यरात्री किंवा १० ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत केव्हाही वाढ होण्याची शक्यता आहे असे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी कळविले आहे.