पाच वर्षापूर्वी संतांच्या पालखी सोहळ्याप्रमाणे बार्शीत शिवरायांचा पालखी सोहळा सुरु करण्याचा निर्णय शहरातील युवकांनी सुरु केला़ विशेष म्हणजे या सोहळ्याला कोणाचेही नेतृत्व नाही़ शहरातील सर्व शिवप्रेमी युवकांचे सामुदायिक नेतृत्व असे या सोहळ्याचे स्वरुप आहे़
या सोहळ्याच्या अग्रस्थानी सर्वात पुढे छत्रपती शहाजीराजे, शिवाजीराजे, शंभूराजे, राजमाता जिजाऊ, सईबाई अशा पेहरावातील बालक अश्वारूढ झालेले होते़ शिवकालीन वेषभूषा असलेले शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ, भोई, शिवरायांची पालखी, मावळे, त्यापाठोपाठ महिला, तरूणी व नंतर पांढरा शर्ट व भगवा फेटा असा पेहराव केलेले व शिस्तीत चालणारे हजारो युवक या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. चौका-चौकात पालखी सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़
ढोलपथकाचे सादरीकरण
यंदा कोरोनामुळे पालखी सोहळ्यात वाद्यवृंद सहभागी झाली नव्हती तर ढोलपथकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सादरीकरण केले़
विद्युत रोषणाई
शहरातील विविध भागात ४० मंडळांनी आर्कषक सजावट करुन शिवारायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती़ १० मंडळांनी प्रतिमेची स्थापना केली होती़ नगरपालिकेचा अर्धपुतळा आणि संस्थेच्या आवारातील अश्वारुढ पुतळा आदी ठिकाणीशिवप्रेमी मंडळांनी विविध प्रकारे शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला़ भगव्या पताका व भगवे झेंडे, आकर्षक विद्युतरोषणाई व सजावटीमुळे संपूर्ण वातावरण हे शिवमय झाले होते़