बार्शी : ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी आकारण्यात येत असलेली लोकवर्गणीची रक्कम पूर्णत: रद्द करण्याच्या शासनाने घेतलेल्या निर्णयाचा अध्यादेश प्रसिद्ध झाला आहे. यापुढील काळात कोणत्याही पाणीपुरवठा योजनेसाठी लोकवर्गणी भरावी लागणार नसल्याचे सांगून यामुळे तालुक्यातील ३३ योजनांचा १ कोटी ३५ लाख रुपयांचा फायदा होणार असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री दिलीप सोपल यांनी दिली़ लोकवर्गणीच्या अटीमुळे पाणीपुरवठ्याच्या योजना राबविण्यास विलंब होत होता़ केंद्राकडूनही प्राप्त होणारा निधीदेखील पर्याप्त प्रमाणात खर्च होऊ शकत नव्हता़ त्यामुळे ही लोकवर्गणीची अट रद्द करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू होते. ही अट रद्द केल्यामुळे योजना वेळेत पूर्ण होऊन योजना रखडल्यामुळे वाढत जाणारी किंमत देखील आटोक्यात येण्यास मदत होणार आहे़ योजनांचे नियोजन, अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती या तिन्ही टप्प्यांमध्ये ग्रामीण जनतेचा सहभाग येत असल्यामुळे लोकसहभागदेखील अबाधित राहणार आहे़ याचा विचार करून २ जुलै रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकवर्गणीची अट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ यापूर्वी ज्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांकरिता पूर्णत: अथवा अंशत: लोकवर्गणीची रक्कम जमा केली असेल तर अशी जमा रक्कम संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेस परत केली जाणार नाही़ तथापि अशा पाणीपुरवठा योजनांमधील उर्वरित लोकवर्गणीची तरतूद पाणीपुरवठा योजनांच्या किमतीमध्ये समाविष्ट करण्यात येईल़ या योजनांच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून वितरित केला जाणारा निधी चार हप्त्यात देण्यात येईल. यामध्ये पहिले तीन हप्ते ३० टक्के व चौथा हप्ता १० टक्के या प्रमाणात निधीचे वितरण करण्यात येणार आहे़ चौथ्या हप्त्याची रक्कम ही पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन एक वर्ष चालविल्यानंतर देण्यात येणार आहे़ हा अध्यादेश ९ जुलै रोजी प्रसिद्ध झाला असला तरी याची अंमलबजावणी २ जुलैपासून लागू होणार आहे़ -------------------------बार्शी तालुक्यातील या गावांना लाभबार्शी तालुक्याचा विचार केला तर १ कोटी ३५ लाख रुपये लोकवर्गणी वाचणार आहे़ राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत तालुक्यातील अंबाबाईचीवाडी, बळेवाडी, बेलगाव, इर्लेवाडी, इंदापूर, कळंबवाडी पा., मळेगाव, रस्तापूर, रातंजन , सर्जापूर, वैराग, येळंब, बावी, हत्तीज, मानेगाव, चुंब, धामणगाव, पिंपळगाव पा., पिंपरी आर., सुर्डी व उंडेगाव योजना मंजूर झालेल्या आहेत़ या योजनांसाठी ११ कोटी ६५ लाख रुपये निधी मंजूर आहे. तसेच या योजनेची कामे प्रत्यक्षात सुरू झालेली आहेत. मात्र त्याचा हप्ता अद्याप मागितलेला नाही. त्यामुळे या योजनांसाठी भरावी लागणारी दहा टक्के लोकवर्गणी वाचणार असून, यामुळे या गावांचे १ कोटी १६ लाख ५० हजार रुपये तर अलिपूर, भांडेगाव, इर्ले, काळेगाव, कापसी, निंबळक, पानगाव, पाथरी, पिंपरी पान, तावरवाडी व खामगाव या गावात ३ कोटी ७० लाख रुपयांची कामे सुरू आहेत़ या योजनांचादेखील पाच टक्के याप्रमाणे १८ लाख ५० हजार रुपये फायदा होणार आहे़
पाणीपुरवठा योजनांची लोकवर्गणी अट रद्द
By admin | Published: July 12, 2014 12:41 AM