श्री. संत दामाजी सहकारी साखर कारखान्याबाबत अशोक जाधव व इतर २१ शेतकऱ्यांनी चौकशीची मागणी केली होती. विशेष लेखापरीक्षक जी. व्ही. निकाळजे यांनी चौकशी करून अहवाल साखर सहसंचालकांना सादर केला होता. अहवालात राज्य बँकेच्या कर्जावर २०१७-१८ व १८-१९ या दोन वर्षांची तारण दिलेली ९० हजार क्विंटल साखर कारखान्याने परस्पर विक्री केली असल्याचे म्हटले आहे. साखर विक्रीतून आलेली २८ कोटी १३ लाख रुपये इतकी रक्कम बॅंकेला भरणा केली नाही. कामगारांचे वेतन थकविणे, कर्मचाऱ्यांच्या फंडाची रक्कम न भरणे, ३८ मदत कर्मचाऱ्यांचे देणे न देणे तसेच २०१८-१९ च्या ताळेबंदावरही अहवालात संशय व्यक्त करण्यात आला होता. या अहवालावर साखर कारखान्याकडून खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
-----
दोन दिवसांत खुलासा अपेक्षित
अहवाल मिळाल्यानंतर साखर सहसंचालकांनी कारखान्याला खुलासा विचारला आहे. त्यावर दोन दिवसांत खुलासा मिळणे अपेक्षित असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
----
आता ते आमदार...
तक्रार व चौकशीवेळी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके होते. चौकशी अहवाल आल्यानंतर कारखान्याचे अध्यक्षच आमदार आहेत. त्यामुळे अहवालाचे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.
---