सोलापूर : सध्या पाच, दहा तसेच शंभर रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासंदर्भात चर्चा सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा सामान्य नागरिक संकटात सापडला आहे. याबाबत कोणत्याही बँकांना अधिकृत सूचना देण्यात आली नाही, मात्र नागरिकांमध्ये नोटबंदीच्या वेळी ५०० आणि १००० च्या नोटा अचानक बंद केल्याने गोंधळ झाला होता. पुन्हा तीच सारखी परिस्थिती निर्माण होईल, या शंकेने नागरिक हैराण झाले असून या नव्या चर्चेने पाच, दहा व शंभर रुपयांच्या जुन्या नोटा चलनात आणण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे.
सध्या विविध माध्यमांद्वारे शंभर, दहा, पाचच्या रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार असल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आहे. त्यामुळे भीतीपोटी सामान्य नागरिक आपल्याजवळील नोटा बाहेर काढत आहे. सध्या चलनात जुन्या नोटा सुरू आहेत, मात्र कधीही आज रात्री १२ वाजेपासून शंभर, दहा, पाचच्या रुपयांच्या नोटांची कायदेशीर निविदा संपुष्टात अशी घोषणा पुन्हा होईल म्हणून नागरिकांत भीती आहे. दहा रुपयांची जी नाणी चलनात आहेत ती वैध आहेत. त्यामुळे व्यापारी, दुकानदारांनी ही नाणी ग्राहकांकडून बिनदिक्कतपणे स्वीकारावी असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. तरीही ते व्यापारी घेत नाहीत.
शंभर, दहा, पाच रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद करण्याबाबतचा बँकांना कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाहीत. रिझर्व्ह बँकेने अथवा शासनाकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत.
- प्रशांत नाशिककर, लीड बँक अधिकारी, सोलापूर
कोणत्याही सूचना नाहीत
शंभर, दहा, पाच रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद होणार आहेत, ही माहिती केवळ माध्यमांवर चर्चा सुरू आहे. आम्हाला अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. मात्र, नागरिकामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्णय झाले आहे. काही नागरिक शंभर रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी येत आहेत.
-अजयकुमार कडू, बँक अधिकारी....
आम्हीदेखील शंभर, दहा, पाच रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद होणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली आहे. शासनाचा तसा काय निर्णय आम्हाला मिळाला नाही, त्यामुळे आम्ही जुन्या नोटा स्वीकारत आहोत.
- सुनील गायकवाड, किराणा व्यापारी
---
दैनंदिन खरेदीकरिता, लहान-मोठ्या वस्तूसाठी पाच, दहा व शंभर रुपयांच्या नोटा अधिक प्रमाणात वापरल्या जातात, जुन्या नोटा बंद करण्याचे वृत्त वाचले. मात्र, त्या नोटा अद्याप बंद झाल्या नाहीत. त्यामुळे शासनाकडून आदेश येईपर्यंत ग्राहकांकडून येणाऱ्या या नोटा आम्ही स्वीकारत आहोत. - - शफिक शेख, किराणा व्यापारी