कुर्डूवाडी : माढा तालुक्यात अनेक गावांतून ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सध्या रंगत येऊ लागली आहे. लक्षवेधी असणाऱ्या बेंबळे, उपळवाटे, उजनी (मा), पालवन या गावच्या निवडणुकीत तर गावातील गट आमने-सामने मोठ्या चुरशीने एकमेकांना लढत देत आहेत. प्रचारात सर्वांनीच आघाडी घेतली असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रलोभने दाखवले जात आहेत.
गावोगावच्या निवडणुकीत आपला गट किती चांगला आहे, समोरचा गट किती वाईट आहे हे पटवून देण्यास सुरुवात केली आहे. बेंबळे ग्रामपंचायतीत १५ जागांसाठी विमलेश्वर ग्रामविकास आघाडीचे व सिद्धेश्वर ग्रामविकास आघाडीचे एकास एक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात एकजण अपक्ष म्हणून भाग्य आजमावत आहे. पार्टी लीडर दिलीप भोसले, गोविंद भोसले, विष्णू हुंबे, पोपट अनपट यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर उपळवाटे ग्रामपंचायत निवडणुकीत ९ जागांसाठी अतुल खूपसे-पाटील व उद्धव माळी, राहुल घाडगे गट या दोन्ही गटांतून एकास एक उमेदवार देऊन काट्याची टक्कर निर्माण केली आहे. पालवन येथील सात जागांसाठी माजी सरपंच परमेश्वर पाटील यांच्या श्री चांदोबा ग्रामविकास आघाडीचे व भारत साळुंखे यांच्या चांदोबा ग्रामविकास आघाडीचे एकास एक उमेदवार निवडून रिंगणात आहेत. येथेही एक अपक्ष उमेदवार आपले भाग्य आजमावत आहे. गाव छोटे असले तरी येथील लढत लक्षवेधी बनली आहे. याबरोबरच उजनी (मा) या मोठ्या प्रमाणावर ऊस बागायती असणाऱ्या गावात यंदा वाॅर्डावाॅर्डांत नेतृत्व बदल होऊन वेगवेगळे गट लढत आहेत. येथील एक जागा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. येथे पार्टी लीडर संतोषबप्पा पाटील, अविनाश निकम, संतोष पाटील, संजय पाटील, समाधान लोकरे यांचीच शेवटी भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. येथील निवडणुकीत यंदा गावपातळीवर गटातटाचे वातावरण तापले आहे. जो तो आपल्या वाॅर्डात लक्ष वेधून काम करीत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीतच सर्व निवडणुकीत आता प्रचारात आघाडी घेऊन चुरस निर्माण झाल्याचे दिसत आहे.
----बिनविरोध होता होता लागली अरणची निवडणूक---राजकीयदृष्ट्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेली अरण ग्रामपंचायत बिनविरोध करायची म्हणून गावकऱ्यांनी व येथील पुढाऱ्यांनी एकमत केले होते. ग्रामसभा आयोजित केली होती. आपापल्या पार्टीचे ठरलेले उमेदवार बिनविरोध निवडून द्यायचे ठरले होते. त्यामुळे १३ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये सर्वांच्या १३ जागेवर १३ फॉर्म भरण्यातही आले होते. इथली निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा झाली होती. परंतु फॉर्म भरण्याची मुदत संपण्याच्या अगोदरच काही कारणाने नाराज झालेल्या काही पदाधिकाऱ्यांनी दोन वाॅर्डातील पाच ठिकाणी अर्ज भरले आणि ते अर्ज माघारीच घेतले नाहीत. त्यामुळे येथे त्या पाच जागांची निवडणूक लागली आहे व इतर ८ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. येथे त्या पाच जागांवर नाराज गट विरोधात बिनविरोध गट अशी लढत होत आहे.
.................