महेश कुलकर्णी
सोलापूर : ऐन निवडणुकीच्या धावपळीत परतीच्या पावसाचा लांबलेला मुक्काम, आॅक्टोबर हिटचे चटके आणि थंडीची चाहूल या एकाच वेळच्या तीन ऋतूंमुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांना प्रकृती सांभाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. शरीरातील तापमानाचा समतोल बिघडल्यामुळे साथीच्या आजारापासून दूर राहण्यासाठी उमेदवारांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार धीरज देशमुख ऐन निवडणुकीच्या प्रचारात तापामुळे रुग्णालयात दाखल आहेत. सोलापूर जिल्ह्यातही अकरा विधानसभा मतदारसंघात १५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दिवसभर प्रचाराचे व्यस्त वेळापत्रक एकीकडे सांभाळताना बदलत्या हवामानामुळे होणाºया आजारापासून दूर राहण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागत आहे.
दिवसा वाढणाºया तापमानामुळे डोळ्यांच्या संसर्गापासून संसर्गजन्य ताप तसेच शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागल्यामुळे थकवा जाणवण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उन्हात फिरताना डोळ्यावर गडद रंगाचा गॉगल घालावा. तसेच डोळ्यातून पाणी आल्यास ते जोरात चोळू नयेत. संसर्ग झाल्यास हात स्वच्छ धुऊन घ्यावेत मगच डोळ्याला हात लावावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले.दुसरीकडे रात्री थंडीची चाहूल लागलेली आहे. यामुळे सर्दी, पडसे, खोकला, घसादुखी तसेच उष्णतेमुळे ताप, डिहायड्रेशन, डोकेदुखी हे आजार वाढीस लागतात. यासारख्या आजारांपासून बचाव करायचा असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार आणि काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच अशा काळात डेंग्यू, मलेरियासाख्या साथीच्या आजाराचाही धोका वाढलेला असतो.
उमेदवारांनी अशी घ्यावी काळजी....
- - संसर्गजन्य आजारांचे स्वरूप समजून घ्या.
- - उष्म्याचा त्रास होत असेल तर उष्णधर्मीय पदार्थांचे सेवन टाळा.
- - आहारात फळे, दूध-दही यांचा वापर करा.
- - तेलकट, मसालेदार पदार्थ टाळा.
- - संसर्ग असल्यास कोमट पाण्याने अंघोळ करा.
- - गरजेपेक्षा अधिक घाम येत असेल तर त्यासाठी उपचार घ्या.
- - प्रतिजैविके सुरू असतील, तर त्याचा कोर्स पूर्ण करा, अर्धवट सोडू नका.
हेल्दी फूड खा!- सध्याच्या मिश्र वातावरणात हेल्दी फूड खाण्यावर भर द्या. आजारांपासून वाचण्यासाठी आहारात प्रोटीनची मात्रा जास्त असेल अशा पदार्थांचेच सेवन करा. फळ, भाज्या, नट्ससारख्या गोष्टींचे सेवन करा. त्याचबरोबर जेवणात अशा गोष्टींचा समावेश करा की, ज्यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम (चयापचय क्रिया) वाढेल. त्यामुळे तुम्ही आजारी पडणार नाही.
भरपूर पाणी प्या!- दिवसातून तीन ते चार लिटर पाणी प्या. तापमान वाढल्यावर शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो. या काळात भरपूर पाणी पिण्याची गरज असल्याचे प्रख्यात डॉक्टर सांगतात. उन्हात फिरताना डोक्यावर टोपी घालावी. शक्य असल्यास उन्हात फिरण्याचे टाळावे, असेही ते नमूद करतात.
सध्याच्या वातावरणात साथीचे आजार टाळायचे असतील तर वरील उपाययोजना करायला हव्यात. यानंतरही आजार कमी न झाल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य उपचार घ्या. विशेषत: स्वाईन फ्लू आणि डेंग्यू यासारख्या जीवघेण्या आजारांची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्या.- डॉ. सूर्यकांत कांबळेसेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी