काॅंग्रेसचे शहर सचिव राजन कामत यांची हकालपट्टी; पक्षविराेधी कारवायांचा ठपका
By राकेश कदम | Published: September 24, 2023 12:13 PM2023-09-24T12:13:11+5:302023-09-24T12:13:38+5:30
राजन कामत हे गेल्या २० वर्षाहून अधिक काळ काॅंग्रेसमध्ये कार्यरत आहेत.
साेलापूर- काॅंग्रेसचे शहर सचिव राजन कामत यांची शहराध्यक्ष चेतन नराेटे यांनी रविवारी हकालपट्टी केली. कामत यांनी पक्षाच्या विराेधात भूमिका आणि कारवाया केल्यामुळे हकालपट्टी केल्याचे नराेटे यांनी सांगितले.
राजन कामत हे गेल्या २० वर्षाहून अधिक काळ काॅंग्रेसमध्ये कार्यरत आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख हाेती. १० वर्षांपूर्वी त्यांनी महापालिकेची निवडणूक लढविली हाेती. या निवडणुकीत त्यांना अपयश आले हाेते. नराेटे म्हणाले, राजन कामत हे पक्षाच्या कार्यालयात एक आणि बाहेर एक बाेलतात. या सर्व गाेष्टींची माहिती आम्हाला मिळाली हाेती. त्यांना याबाबत समजही दिली हाेती. परंतु, त्यांच्या बाेलण्यात फरक पडला नाही.
शनिवारी त्यांना २४ तासांची खुलाशाची नाेटिस दिली हाेती. या नाेटिशीला समाधानकारक उत्तर न आल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रदेश काॅंग्रेसच्या नेत्यांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे. यापुढील काळात पक्षविराेधी कारवाया करणारांची हकालपट्टी हाेईल, असेही नराेटे यांनी सांगितले.