सोलापूर : घातक शस्त्र बाळगून बेकायदेशीर जमावाद्वारे शहरवासीयांना उपद्रवी ठरलेला सराईत गुन्हेगार राजू पंडित हत्तुरे याला तडीपारीचा आदेश बजावूनही त्याच्या वर्तनात बदल न झाल्याने पोलीस आयुक्तांनी मंगळवारी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अन्वये स्थानबद्ध आदेश बजावला. त्याची पुण्याच्या येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली.
शहरातील सलगरवस्ती व विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजू हत्तुरे (वय- २७, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी २, सोलापूर) या गुन्हेगाराने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करुन बेकायदेशीर जमावाद्वारे दगडफेक करणे, खंडणी उकळणे, जबरी चोऱ्या , तडीपार आदेशाचा भंग करणे अशा स्वरुपाचे गंभीर पाच गुन्हे पोलीस रेकार्डवर आहेत.
त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील नागिरकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. त्याच्या दहशतीमुळे उघडपणे नागिरक पोलिसांना माहिती देण्यास कचरतात. यामुळे ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
संधी देऊनही उपयोग झाला नाही
राजू पंडित हत्तुरे याला गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी २०१७ मध्ये व २०२३ मध्ये तडीपारीसह प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. यानंतरही त्याच्या वर्तनात बदल झाला नाही. या कृत्यास वेळीच पायबंद घालण्यासाठी पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अधिनियम १९८१ च्या कलम ३ नुसार स्थानबद्धतेचे आदेश काढले. त्याची पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.