दोन देशमुखांच्या वादात सोलापूरकर वेठीला, अजित पवार यांची टिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 10:54 AM2018-04-07T10:54:03+5:302018-04-07T10:54:03+5:30
सोलापूर : दोन देशमुख सरळ वागत नाहीत. त्यांनी सोलापूरचे नाव बदनाम केले. त्यांना धड कर्तृत्व दाखवता येत नाही आणि नेतृत्वही करता येत नाही. त्यांच्यामुळे सोलापूरच्या ग्रामीण भागाला आणि शहराला वेठीस का धरता, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी भाजप सरकारला केला. शरद पवारांच्या निर्णयाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सोलापूर विद्यापीठाला नाव देण्याचा निर्णय घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल आंदोलन सभा नॉर्थकोट मैदानावर झाली. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, उजनी धरण यावर्षी भरुनही पाणी मिळत नसेल तर काय उपयोग. सोलापुरातील वीणकर उद्योग शेजारच्या तेलंगणाला जाण्याच्या तयारीत आहे. ही बाब भूषणावह आहे का? दोन देशमुखांच्या भांडणात धड नाय मला, धड नाय तुला... अशी अवस्था झाली आहे. सुभाष देशमुखांनी तर आपले घर आरक्षित जागेत बांधले आहे. बेकायदेशीर काम करणे त्यांना शोभते का? जुळे सोलापुरातील आरक्षित जागेची फाईल माझ्याकडे आली आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये हुकूमशाही सुरु आहे.
लोकशाही पद्धतीने निवडणुका घ्या. लोकशाही दावणीला बांधताय का?, असा सवालही त्यांनी केला. सहकारमंत्र्यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावातून पिटाळून लावल्याची उदाहरणेही त्यांनी वाचून दाखविली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रकाश शेंडगे, जिल्हा निरीक्षक प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोलते-पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, उमेश पाटील, निर्मला बावीकर, सुनीता रोटे, मनोहर सपाटे, किसन जाधव, महेश गादेकर, जुबेर बागवान यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. चंद्रकांत पवार यांनी आभार मानले.