सोलापूर : विषबाधा प्रकरण आणि महापौर कार्यालयाशी संबंधित असलेली माहिती मिळत नसल्याने भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्यासह भाजपाच्या नगरसेवकांनी बुधवारी सायंकाळी नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांच्या कार्यालयात ठिय्या मारला. माहिती देणार की नाही ते बोला, अन्यथा तुम्हाला निलंबित करायला लावतो, अशी तंबी नगरसेवकांनी दिली. दंतकाळे बराच वेळ भेदरलेल्या अवस्थेत होते.
सुरेश पाटील यांना विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, भाजपाच्या पदाधिकाºयांवरच आरोप केले आहेत. पोलीस अधिकारी चौकशीदरम्यान सुरेश पाटील यांच्याकडून कागदपत्रे मागत आहेत. ही कागदपत्रे मिळावीत यासाठी सुरेश पाटलांनी नगरसचिव कार्यालयाला अर्ज दिले आहेत. नगरसचिव दंतकाळे यांनी चार हजार कागदांचा संच पाटलांना दिला आहे. पण महापौर शोभा बनशेट्टी यांच्या वाहनासाठी दिलेले इंधन, इतर खर्च व कार्यालयातील निर्णय याबाबतची माहिती पाटलांना हवी आहे. पण ती मिळत नसल्याने त्यांनी यापूर्वी नगरसचिव दंतकाळे यांच्या कार्यालयात ठिय्या मारला होता.
आज पुन्हा जवळपास ५० ते ६० कार्यकर्ते घेऊन सुरेश पाटील आले. काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे यांच्यासह भाजपाच्या नगरसेविकांसमवेत त्यांनी दंतकाळे यांच्या कार्यालयात ठिय्या मारला. सोमवारपर्यंत महापौर कार्यालयातील लिपिकाने माहिती न दिल्यास त्याच्या निलंबनाची मागणी करु, असे आश्वासन दंतकाळे यांनी दिल्यानंतर नगरसेवकांनी काढता पाय घेतला.
म्हणून जमवली गर्दी : पाटील- तुम्ही सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आहात. अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना जमवून अधिकाºयांवर दबावतंत्र आणता, असा प्रश्न सुरेश पाटील यांना विचारल्यानंतर ते म्हणाले, गेल्या चार महिन्यांपासून मी माहिती मिळावी म्हणून पाठपुरावा करीत आहे. नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांना अडचण असेल तर त्यांनी लेखी द्यावे. माझ्यावर अन्याय झाला. पोलीस तपासासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मागूनही मिळत नसल्याने मी आणि माझे कार्यकर्ते संतप्त झालो आहोत. पुढील काळात आम्हाला आंदोलनही करावे लागेल.