करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुनील शिंदे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रभारी सचिव पदाचा चार्ज विठ्ठल क्षीसागर यांच्याकडे दिल्याने बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर यांनी सेवानिवृत्त सचिव शिंदे यांनी मला विश्वासात न घेता क्षीरसागर यांच्याकडे चार्ज दिल्याने पणन संचालक, पुणे यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार पणन संचालक सतीश सोनी यांनी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांना बाजार समितीच्या संचालक मंडळाची सभा बोलावून प्रभारी सचिव पदाचा निर्णय घ्यावा, असे आदेश दिले आहेत.
त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर यांनी सभेचा प्रभारी सचिवपदाचा निर्णय घेणे या विषयाचा सभेचा अजेंडा काढला आहे. मंगळवार, दि. २९ जून रोजी सकाळी ११ वाजता संचालक मंडळाची सभा बाजार समितीच्या सभागृहात बोलावली आहे.
----
दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळात प्रभारी सचिव नेमणुकीसंदर्भात वाद पेटलेला आहे. जगताप गटाने विठ्ठल क्षीरसागर यांची, तर बागल गटाने राजेंद्र पाटणे यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. दोन्ही गटांने प्रभारी सचिव पद प्रतिष्ठेचा प्रश्न केल्याने मंगळवारी होणाऱ्या सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे.