आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर शहरात सातत्याने होणारा विस्कळीत पाणीपुरवठा, कर्नाटक राज्यातील लोक सोलापूरचे पाण्याची करीत असलेली चोरी व उजनी-सोलापूर दुहेरी समांतर जलवाहिनीचे रखडलेले काम सुरू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी जिल्हा परिषदेसमोर ठाकरे सेनेच्यावतीने बिरबलाची बिर्याणी या थीमवर अनोखे आंदोलन केले.
सत्ताधारी भाजपाने सोलापूरकरांना वारंवार एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले होते, परंतु एक दिवसात सोडा पाणीपुरवठा सहा दिवसाला एकदा होत आहे. त्यातच सोलापूरकरांच्या हक्काचे पाणी कर्नाटक सरकार चोरून इंडीच्या जनतेची पाणीपुरवठा योजना त्यावर राबवत आहे. हे सर्व घडत असताना. राज्य शासन व महापालिका प्रशासन कसल्याही प्रकारे कारवाई करत नाही. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण, शहर उत्तर विधानसभेचे संघटक महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी महापालिकेच्या व कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी विदयार्थी सेनेचे लहू गायकवाड, शिवसेनेचे उपशहर प्रमुख बाळासाहेब गायकवाड, रतन खैरमोडे, संदीप बेळमकर, संताजी भोळे, सुरेश जगताप, अण्णा गवळी, विजय पुकाळे यांच्यासह मलिक हब्बू, राहुल परदेशी, महेश गवळी, नागेश कोळी, जर्गीस मुल्ला, उत्कर्ष जगदाळे, नाना कळसकर, अमित भोसले, आसिफ मुल्ला, अमित भोसले, रिक्षा सेनेचे बाळासाहेब पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.