सोलापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदच्या माध्यमातून जिल्ह्यातील बचत गटांना १० कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांनी दिली. नवाळे म्हणाले, जिल्ह्यात आजतागायत उमेदवार अभियानाद्वारे एकूण १३ हजार ६६६ स्वयंसहायता समूहाची बांधणी झालेली आहे. ५६० ग्रामसभांची बांधणी झालेली आहे. जिल्हा परिषद स्तरावरही ३१ प्रभाग संघांची बांधणी झालेली आहे. या बचत गटांना वेळोवेळी पुस्तक लेखे, प्रगत सेंद्रिय शेती, पशुपालन, बिगरशेती उद्योग, नेतृत्व विकास यासह विविध प्रकारच्या क्षमता बांधणीचे प्रशिक्षण दिले जाते. बचत गटातील महिलांना घरगुती वैैयक्तिक गरजांसाठी खेळते भांडवल दिले जाते. यातून गटांचे भांडवलही वाढते. गेल्या तीन महिन्यांत बचत गटांना १० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. यामध्ये बिगरशेती पशुपालन करण्यासाठी ११२१ गटांना ६ कोटी ७३ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. रेशीम उद्योग, पेपर पत्रावळी, गांडूळ खत बेड, कुक्कुटपालन खवाभट्टी यासह उद्योग- व्यवसायासाठी रुपये ३० लाख ४५ हजार रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.
उमेदचा भारुड पॅटर्न- ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून घरकूल बांधणी आणि बचत गटांचे जाळे हे विशेष कार्यक्रम राबविले जातात. केंद्र आणि राज्य शासनाचे हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या नियोजनामुळे सोलापूर जिल्हा या दोन्ही उपक्रमांमध्ये राज्यात आघाडीवर आहे. उमेदच्या माध्यमातून पतपुरवठा करण्यात राष्ट्रीयीकृत बँकांची मानसिकता हा मुख्य अडसर आहे. जिल्हा प्रशासनाकडे झालेल्या बैठकांमध्ये यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करण्यात आला. शिवाय ग्रामीण विकास यंत्रणेकडे नियमित आढावा घेऊन कामांना गती देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बचत गटांना मोठ्या प्रमाणावर पतपुरवठा होऊ लागला आहे.