सुस्ते हे गाव कोरोना प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. गावामध्ये दिवसेंदिवस नऊ ते दहा रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत रेशन कार्डधारकांना धान्याचे वाटप कसे करणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, स्वस्त धान्य दुकानदार आनंद भारत चव्हाण यांनी नामी शक्कल लढवून लोखंडी अँगलचा सांगाडा तयार केला. त्या सांगाड्यात एकावेळी २५ ते ३० किलो धान्य बसणारा व्ही आकाराचा लोखंडी पत्रा तयार करून त्या पत्राला चार इंची पीव्हीसी पाइप जोडून धान्य वाटप यंत्र तयार केले आहे.
या धान्य वाटप यंत्रात धान्य वजन करून टाकल्यानंतर कार्डधारकांच्या सात ते आठ फुटांवर पिशवीत धान्य पडत आहे. या धान्य वाटप यंत्रामुळे धान्य वाटप करणारी व्यक्ती व कार्डधारक यांच्यामध्ये कमीत कमी सात ते आठ फूट अंतर ठेवून धान्य वाटप होत आहे. या धान्य वाटप यंत्रामुळे कोरोनाचा संसर्ग होणार नसल्याचे आनंद चव्हाण यांनी सांगितले.
प्रतिव्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ तसेच एका रेशनकार्डाला १ किलो हरभरा डाळीचे वाटप केले जात आहे. एका दिवसाला ६५ ते ७० कार्डधारकांना धान्य वाटप केले जाते. स्वस्त धान्य दुकानात धान्य वाटपावेळी गर्दी होऊ नये यासाठी सरपंच कांताबाई रणदिवे, उपसरपंच तुषार चव्हाण, पोलीस पाटील मनीषा कांबळे, जीवन रणदिवे यांनी भेट देऊन कार्डधारकांनी धान्य घेताना गर्दी करू, असे आवाहन केले आहे.