सांगोला तालुक्यातील शाळा व अंगणवाडीमध्ये वर्षातून दोन वेळा राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जाते. तालुक्यात अंगणवाडीतील २१ हजार ८६६, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ३९ हजार ५७५, खासगी शाळांमधील ६ हजार ४४ आणि ५६६ शाळाबाह्य अशा ७५ हजार ९४० मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. आशा वर्कर व अंगणवाडीसेविका यांच्यामार्फत जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. तालुक्यात एक मार्चपासून जंतनाशक मोहीम राबविली जात आहे.
शाळा, अंगणवाडीस्तरावर गोळ्या वाटप सुरू असून घरोघरी जाऊन लहान बालकांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे ग्रामीण भागात या मोहिमेला अडचण येत आहे. आरोग्य विभागाच्या वतीने आशा कार्यकर्ती व अंगणवाडीसेविका यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. लहान बालकांना घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहेत.
तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविला जात आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद आहे. शालेय विद्यार्थ्यांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग असून उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.
---
तालुक्यात अंगणवाडी, जिल्हा परिषदेच्या शाळा, खासगी शाळांसह शाळाबाह्य असे ७५ हजार ९४० लाभार्थी आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने जंतनाशक गोळ्या देण्यासाठी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांना घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्या वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- डॉ.सीमा दोडमणी, तालुका आरोग्य अधिकारी.