पंढरपूर तालुक्यात रेशन धान्य दुकानात वितरण होणाऱ्या धान्यामधील निकृष्ट दर्जाच्या डाळीचे वितरण होत असल्याच्या तक्रारी शिधापत्रिकाधारक गेल्या अनेक दिवसांपासून करत होते. रेशन दुकानात वितरित करण्यात येत असलेल्या धान्यात जी डाळ आहे, ती किडकी दिली जाते. असे उघडपणे नागरिक बोलत होते. मात्र, प्रशासन त्याकडे फारसे गांभीर्याने पाहात नव्हते. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची भेट घेऊन आक्रमक धोरण स्वीकारत त्यांच्याकडे तक्रार केली व निकृष्ट दर्जाची डाळ शिधापत्रिकांधारकांच्या माथी मारली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले असल्याचे जिल्हा सरचिटणीस सूरज पेंडाल यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष सुधीर भोसले, युवक शहराध्यक्ष स्वप्निल जगताप, तालुका कार्याध्यक्ष सारंग महामुनी उपस्थित होते. यापुढे असे वितरण होत असल्यास नागरिकांनी ती डाळ घेऊन नये, घेतल्यास त्याची शिधापत्रिकेवर नोंद करून घेऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी युवकतर्फे केले आहे. प्रशासनाने याची खबरदारी न घेतल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
एक वर्ष जुन्या डाळीचे वाटप
लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना मदत म्हणून राज्य सरकारमार्फत गहू, तांदूळ, डाळींचे मोफत वाटप हाेत आहे. या कालावधीत नव्याने आलेल्या मालाचे नागरिकांना वितरण होणे गरजेचे असताना, पंढरपूर पुरवठा विभागाकडून मात्र गेल्या वर्षभरापासून शासकीय धान्य गोदामात पडून राहिलेली डाळ वाटप करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नवीन आलेला डाळीचा कोटा कुठे गेला, असा सवाल राष्ट्रवादीकडून उपस्थित केला जात आहे. कीड लागलेली, सडलेली डाळ नागरिकांच्या माथी मारून मोफत धान्य वितरणाच्या नावाखाली गोरगरीब नागरिकांची पुरवठा विभाग, सरकारने थट्टा लावली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
हा प्रकार तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी निकृष्ट दर्जाच्या डाळीचे वितरण थांबविण्याचे आदेश दिले आहेत, शिवाय शिल्लक डाळ परत पाठविण्याच्या सूचना रेशन दुकानदारांना दिल्या आहेत.